प्रदर्शित झाल्यापासूनच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चं बॉक्स ऑफिसवर साम्राज्य पाहायला मिळत आहे. १७ दिवसांनंतरही 'पुष्पा २'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला कायम आहे. पण, आता 'पुष्पा २'ला टक्कर द्यायला 'मुफासा: द लायन किंग' हा सिनेमा आला आहे. अवघ्या दोनच दिवसात 'मुफासा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.
बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'मुफासा' हा सिनेमा शुक्रवारी(२० डिसेंबर) प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'मुफासा'ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमध्ये 'मुफासा'चे शो हाऊसफूल होत आहेत. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी या सिनेमाने ८.८ कोटींचा गल्ला जमवला. सुरुवात जरी धिम्या गतीने झाली असली तरीदेखील दुसऱ्या दिवशी 'मुफासा'ने १३.७ कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा सिनेमा किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
'मुफासा: द लायन किंग' हा एक अॅनिमेशन चित्रपट आहे. 'द लायन किंग' हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यानंतर 2019 मध्ये या चित्रपटाचा रीमेक बनवण्यात आला. आता तब्बल 5 वर्षांनंतर त्याचा प्रीक्वल आला आहे.
शाहरुखने मुफासा या मुख्य भूमिकेचं हिंदीत डबिंग केलं आहे. तर आर्यनने मुफासाचा मुलगा सिंबा आणि अबरामने तरुण मुफासाचं रेकॉर्डिंग केलं आहे. या सिनेमासाठी शाहरुख आणि त्याच्या लेकांबरोबरच श्रेयस तळपदे, मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, मियांग चांग या कलाकारांनीही आवाज दिले आहेत. तर तेलुगु भाषेतील डबिंगसाठी सुपरस्टार महेश बाबूने या चित्रपटाला आवाज दिला आहे.