Join us

'म्युझिक हराम आहे..'; 'मिया भाई' फेम रॅपरचा संगीत क्षेत्रातून काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 18:28 IST

Ruhaan Arshad: 'मिया भाई' रॅपमधून प्रकाशझोतात आलेल्या हैदराबादी रॅपर रुहान अर्शदने संगीत क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

'मिया भाई' रॅपमधून प्रकाशझोतात आलेल्या हैदराबादी रॅपर रुहान अर्शद (Ruhaan Arshad) याने संगीत क्षेत्रातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. रुहानने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करुन म्युझिक इंडस्ट्री सोडत असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे संगीत विश्व सोडण्यामागे त्याने एक धक्कादायक कारण दिलं आहे.

रुहानने त्याच्या 'रुहान अर्शद ऑफिशियल' या युट्यूब पेजवर ७ मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने संगीत क्षेत्र सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. तसंच हे क्षेत्र सोडताना मला जराही वाईट वाटत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

"मी पूर्णत: संगीत क्षेत्र सोडत आहे. यापुढे मी म्युझिक व्हिडीओ करणार नाही किंवा संगीताशी संबंध ज्या गोष्टी असतील त्या करणार नाही. मी माझ्यावर भावनांवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करेन. मला माहित होतं इस्लाममध्ये म्युझिक हराम आहे. पण, केवळ माझं पॅशन म्हणून मी हे करत होतो. अल्लाहची कृपा आणि तुमच्यामुळे आज मी या ठिकाणी पोहोचलो. पण मला खात्री आहे या ठिकाणी थांबल्यानंतर अल्लाह मला एक चांगली संधी देईल. हलाल पद्धतीने मला यश मिळेल. मला अल्लाहावर पूर्ण विश्वास आहे", असं रुहान म्हणाला.

पुढे तो म्हणतो,  "मी संगीत क्षेत्र नेमकं का सोडतोय हे तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये सांगेन. तुमच्या संपर्कात नक्कीच राहीन. सध्या तरी मी युट्यूब सोडणार नाहीये. खूप मेहनत आहे माझी. फक्त म्युझिक हराम आहे. आतापर्यंत मी जे करत आला होतो ती गोष्ट आता सोडतोय. यापुढे मी म्युझिक व्हिडीओ करणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. या निर्णयावर मी ठाम आहे आणि खूश आहे. आशा आहे तुम्ही माझ्या या निर्णयामध्ये माझी साथ द्याल." 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रुहानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज त्याने हा व्हिडीओ शेअर करत म्युझिक इंडस्ट्री सोडणार असल्याचं सांगितलं. रुहान हा प्रसिद्ध रॅपर आणि फेमस युट्यूबरदेखील आहे. 'रुहान अर्शद ऑफिशियल' हे त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव असून त्याने या चॅनेलवर अनेक म्युझिक व्हिडीओ अपलोड केले आहेत. रुहानचे युट्यूबरवर तब्बल तब्बल 2.34 मिलीयन (सुमारे 23 लाख) सबस्क्राइबर्स आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीटिव्ही कलाकारयु ट्यूब