Join us

यंदा होळीच्या उत्साहाला मुकलो, 'बिग बीं'नी व्यक्त केली मनातील खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 05:49 IST

अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी दरवर्षी होळी उत्साहात साजरी होते

मुंबई : ‘रंग बरसे भिगे चुनरवाली...’ म्हणत मोठ्या पडद्यावर उत्साहात होळी साजरी करणारे बिग बी अर्थात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी दरवर्षी होळी उत्साहात साजरी होते. मात्र, यंदा या उत्साहाला मुकल्याची रुखरुख बच्चन यांना लागली आहे. दुखापतीमुळे सध्या आराम करत असलेल्या बच्चन यांनी ही खंत ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली, तसेच होळीच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. 

‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने अमिताभ यांना हैदराबाद येथून मुंबईला परतावे लागले. एका हाणामारीच्या दृश्याचे चित्रीकरण करतेवेळी ८० वर्षीय बच्चन यांना ही दुखापत झाली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी होळीच्या निमित्ताने, बच्चन यांनी त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर रंगांचा सण उत्साहात साजरा करू न शकल्याबद्दल निराशा व्यक्त केली. दुखापतीमुळे होळीच्या आनंदात सहभागी होता येत नसल्याचे बच्चन यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. दरवर्षी होळी उत्साहात साजरा करतो. मात्र, यंदा तसे झाले नाही, ही रुखरुख मनाला लागल्याचे बच्चन लिहितात.

बच्चन यांच्या निवासस्थानी दरवर्षी होळी आणि दिवाळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी या उत्साहात सहभागी होत असतात. मंगळवारी बच्चन यांनी चाहते आणि फॉलोअर्सच्या चिंता आणि शुभेच्छांबद्दल आभार मानणारे एक ट्वीट शेअर केले.

टॅग्स :अमिताभ बच्चनहोळी 2023