Miss World 2025: मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन यंदा हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेतून मिस इंग्लंड २०२४ मिला मॅगी हिने माघार घेतली आहे. २४ वर्षीय मिला मॅगी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात आली होती. मात्र मध्येच माघार घेत ती तिच्या मायदेशी परतली. आता तिने मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेवर गंभीर आरोप केले आहेत. तेलंगनामध्ये असताना वाईट वर्तणूक मिळाल्याचं मिला मॅगी हिचं म्हणणं आहे.
मिला मॅगी मिस वर्ल्ड २०२५ साठी ७ मे रोजी भारतात आली होती. पण, १६ मे रोजी या स्पर्धेतून माघार घेत ती युकेला परतली. आता तिने द सन या ब्रिटीश न्यूजपेपरला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. सकाळच्या नाश्तापासून ते दिवसभर जबरदस्ती मेकअप लावून बसवण्यात आल्याचा खुलासा मिला मॅगीने केला. याशिवाय स्पर्धकांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या स्पॉर्नर्ससोबत मिळून मिसळून राहण्यास सांगण्यात आल्याचंही तिने सांगितलं.
"मी तिथे काहीतरी वेगळं करण्यासाठी गेले होते. पण, आम्हाला मदारीच्या माकडांसारखं बसवलं गेलं होतं. मी याचा भाग होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला गेस्टला खूश करायला सांगितलं जातं. हे मला खूप चुकीचं वाटतं. मी कोणाचंही मनोरंजन करण्यासाठी इथे आलेली नाही. मला वेश्यासारखं वागवलं गेलं", असं म्हणत मिला मॅगीने गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेनंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. तेलगंणाचे नेते केटी रामा राव यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मिस वर्ल्ड सीईओ जुलिया मोर्ले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मिस इंग्लंड मिला मॅगीने आईची तब्येत बिघडल्याचं कारण सांगत माघार घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.