अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'मै हूँ ना'. या सिनेमात शाहरुखने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती. मात्र सिनेमात तो एका मिशनवर असल्याने अर्धा सिनेमा तो कॉलेज विद्यार्थ्याच्याही भूमिकेत दिसला. त्याच्यासोबत झायेद खान, अमृता राव हे देखील दिसले. या सर्व मित्रांचा ग्रुप सिनेमात दाखवला आहे. मात्र तुम्हाला माहितीये का सिनेमात एका मराठी अभिनेत्रीचीही झलक दिसली होती. कोण आहे ती?
मराठी कलाकार हिंदीत जातात तेव्हा कायमच अप्रूप वाटतं. अशीच एक अभिनेत्री जिने हिंदीत बॅकस्टेज बरंच काम केलं आहे. ती म्हणजे शाल्मली टोळ्ये (Shalmali Tolye). शाल्मलीने नृत्यांगना म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिने सोनू निगम, ए आर रहमान यांच्या डान्स शोमध्येही डान्स केला आहे. त्यांच्यासोबत अनेक दौरे केले आहेत. सध्या शाल्मली वेशभूषाकार म्हणजेच सेलिब्रिटी स्टायलिस्ट म्हणून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये लहान मुलांच्या सेगमेंटसाठी तिने कॉस्च्युम स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे. ही शाल्मली शाहरुख खानच्या 'मै हूँ ना' मध्ये काही वेळासाठी दिसली होती. तिचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सिनेमाच्या आठवणी सांगताना शाल्मली एकदा म्हणालेली की, "या चित्रपटाचे चित्रीकरण दार्जिंलिंगला होते. नोव्हेंबर-डिसेंबरच्या थंडीत आम्ही तिथे चित्रीकरण करत होतो. थंडीत तिथे अंधार लवकर होतो. त्यामुळे संध्याकाळी चारच्या आत पॅकअप व्हायचे आणि चित्रीकरण सकाळी सहालाच सुरू व्हायचे. त्या थंडीत सकाळी चारला आंघोळ करताना आमची अवस्था अतिशय वाईट व्हायची. पाणी कितीही गरम असले तरी ते क्षणात थंड व्हायचे. आम्ही सगळ्या मुली आंघोळ करताना अक्षरशः किंचाळायाचो. फरहा खान सगळ्या टीमची खूप काळजी घेत असे. आमची टीम एखाद्या कुटुंबासारखी होती. दर शुक्रवारी एक ते सव्वा तासाचा एक कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमात आम्ही नाचायचो, नाटक सादर करायचो आणि ते पाहाण्यासाठी फराह खान, शाहरुख खान, सुश्मिता सेन यायचे."
ती पुढे म्हणालेली की, "माझे एक नृत्य तर शाहरुखला इतके आवडले की, त्याने स्टेजवर येऊन माझ्या कपाळावर किस केले होते. माझ्या आयुष्यातील हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. फरहा खान तर मला आणि माझ्या एक मैत्रिणीला गिगलिंग गर्ल्स असे म्हणायची. मी कॉलेजमध्ये एकांकिकांमध्ये काम केले असल्याने मला अभिनयाची जाण होती. त्यामुळे अनेक दृश्यात तिने माझ्याकडून अभिनयदेखील करून घेतला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत मैत्री कोण करणार असे बोमन इराणी विचारतात आणि त्यानंतर अमृता मैत्री करेल असे म्हणत तिच्याकडे बोट दाखवतात असे एक दृश्य आहे. त्या दृश्यात मी अमृताच्या बाजूलाच बसले होते. "