संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमात काही मराठी कलाकारांनीही भूमिका साकारली होती. त्यापैकीच एक वैभव तत्ववादी. त्याचं काम पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. पण तुम्हाला माहितीये का याच भूमिकेसाठी आणखी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानेही ऑडिशन दिली होती. मात्र त्याची निवड होऊ शकली नाही. हे रिजेक्शन त्याच्या मनाला खूपच लागलं होतं असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं. कोण आहे तो अभिनेता?
'क्लासमेट्स','फर्स्टक्लास दाभाडे' या सिनेमांमध्ये दिसलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. त्याने 'बाजीराव मस्तानी'साठी ऑडिशन दिली होती. मात्र त्याची निवड का होऊ शकली नाही हे त्याने सांगितलं होतं. जिव्हारी लागलेलं कोणतं रिजेक्शन आहे असं त्याला विचारण्यात आलं होतं. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणालेला, "रिजेक्शनपेक्षा एखाद्या भूमिकेसाठी माझा विचारच न करणं हे मला जिव्हारी लागलं आहे. बाजीराव मस्तानी साठी मी ऑडिशन दिली. चांगली ऑडिशन झाली होती. मीही खूप सकारात्मक होतो. पण रिजेक्ट झालो. तरी वैभव तत्ववादी सारख्या अभिनेत्याची निवड झाली हे बरं वाटलं. नंतर त्याचं काम पाहिल्यावर मला कळलं की तो या भूमिकेसाठी का पात्र होता. कारण त्याने अक्षरश: जीव ओतून काम केलं. मला ते भारी वाटलं."
मी उमेश कुलकर्णींकडे एका सिनेमासाठी ऑडिशनला गेलो होतो. उमेश कुलकर्णी माझा आवडता दिग्दर्शक आहे. तो कधी मला बोलवेल याची मी अक्षरश: वाट बघत होतो. ऑडिशन छान झाली. पण काही कारणाने तिथेही रिजेक्ट झालो. ते रिजेक्शन कायम मनात राहिलं. माझ्या काही मित्रांनीच केलेले सिनेमे आहेत ज्यात माझा विचारही केला गेला नाही त्यामुळेही वाईट वाटलं होतं. पण नंतर जाणीव झाली की माझा विचार का गेला नसेल. मी स्वत:ला गांभीर्याने घ्यायचो नाही. हा स्व:ला एवढं गांभीर्याने घेत नाही मग भूमिकेला काय घेईन असं त्यांना नक्कीच वाटलं असेल जे चूकीचं नाहीए."