दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) एकमेकांचा चांगले मित्र आहेत. १९९८ साली आलेल्या 'सत्या' या सिनेमापासून त्यांच्यात मैत्री आहे. या सिनेमातून मनोज वाजपेयी यांना वेगळी ओळख मिळाली. तर अनुरगा कश्यपने सिनेमासाठी स्क्रीनप्ले रायटरचं काम केलं होतं. नंतर अनुराग कश्यपच्याच 'गँग्स ऑफ वासेपूर' २०१२ साली आलेल्या सिनेमात मनोज वाजपेयी यांनी मुख्य भूमिका साकारली. हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून नावारुपास आला. आता नुकतंच मनोज वाजपेयी यांनी अनुराग कश्यपसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, "आम्हाला दोघांना जोडणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे राग. अनुराग त्याच्या दृढतेमुळे उभा आहे. यामुळे त्याने बरेच दुश्मनही बनवून ठेवले आहेत. त्याने रागात आरसा फोडला, स्वत:च्या हाताल इजा केली, आजारी पडला पण स्वत:च्या म्हणण्यावर ठाम राहिला. तो अन्य निर्मात्यांसमोर एक चांगलं उदाहरण होऊ शकतो कारण लोक फक्त त्याचे सिनेमे बघतात. मात्र त्याने त्याचा प्रवास पाहून शिकलं पाहिजे."
ते पुढे म्हणाले, "अनुराग जितका रागीट आहे त्याहून जास्त व्यावहारिक आहे. पण मी त्याच्यापेक्षा जास्त व्यावहारिक आहे. तो कधी कधी स्वत:वरचं संतुलन हरवून बसतो. ज्या दिवशी तो ट्रोलर्सला उत्तरं द्यायला लागतो तेव्हा मला वाटतं की त्याचं स्वत:वरचं नियंत्रण सुटतंय. पण नंतर तो परत जागेवर येतो."
मनोज वाजपेयी यांचा 'इन्सपेक्टर झेंडे' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. सिनेमा कॉमेडी घेण्यात आला असून यामध्ये भाऊ कदम, हरिश दुधाडे आणि ओंकार राऊत यांचीही भूमिका आहे. तर चिन्मय मांडलेकरने सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.