Join us

"लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार...", सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर मनोज वाजपेयी यांनी मांडलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:03 IST

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं प्राणी हक्क कार्यकर्ते आणि सेलिब्रिटी यांच्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक या निर्णयाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक याला विरोध करत आहेत.

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपापली मते मांडली आहेत. या वादात आता अभिनेता मनोज वाजपेयींनीही उडी घेतली आहे. त्यांनी या विषयावर एक महत्त्वपूर्ण आणि तटस्थ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक संदेश शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज वाजपेयी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली. ज्यात त्यांनी लिहिले की, "या प्राण्यांनी स्वतःहून रस्ते निवडलेले नाहीत, त्यामुळे ते दयेला पात्र आहेत. तसेच लोकांनाही सुरक्षित वाटण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग हा सहानुभूतीचा असावा. भीतीमुळे त्यांचे भवितव्य ठरवले जाऊ नये". मनोज वाजपेयीं यांच्या या विधानातून त्यांनी दोन्ही बाजूंचा विचार केल्याचे दिसून येते. त्यांनी केवळ प्राण्यांच्या हक्कांविषयीच नाही, तर लोकांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा मांडला.

अनेक सेलिब्रिटींकडून निर्णयाला विरोधसर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी विरोध दर्शवला आहे. अभिनेत्री अदा शर्मा, वरुण धवन, जान्हवी कपूर, रवीना टंडन आणि टीना दत्ता यांसारख्या कलाकारांनी यापूर्वीच सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्याची मागणी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतरचे पडसाद११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगाव आणि फरीदाबादमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व भाग भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, पकडलेल्या प्राण्यांना पुन्हा रस्त्यावर सोडू नये असेही आदेश दिले होते. या निर्णयानंतर, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह देशाच्या अनेक भागांमध्ये प्राणीप्रेमी आणि प्राण्यांच्या हक्क संघटनांनी निदर्शने सुरू केली. त्यांनी न्यायालयाला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूडकुत्रासर्वोच्च न्यायालय