Join us

मनीषा कोईरालाने नाकारला 'दिल तो पागल है', तिच्याजागी करिश्मा कपूरची लागली वर्णी, या मागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:15 IST

Manisha Koirala : निर्माते यश चोप्रा यांनी त्यांचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'दिल तो पागल है' मनीषा कोईरालाला ऑफर केला होता. मनीषाला ती भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर करिश्मा कपूरने केली होती.

अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'खामोशी', 'बॉम्बे', 'दिल से', 'मन', 'लज्जा'सह अनेक हिट सिनेमात काम केले आहे. एकेकाळी ती आघाडीच्या चित्रपट निर्मात्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकली आहे. आता मनीषा लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' (Heeramandi) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यादरम्यान तिने दिलेल्या मुलाखतीत एक खंत बोलून दाखवली.

फार कमी लोकांना माहिती आहे की, चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी त्यांचा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 'दिल तो पागल है' मनीषा कोईरालाला ऑफर केला होता. मनीषाला ती भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर करिश्मा कपूरने केली होती. पण याच अनुभवाने मनीषाला तिच्या निवडीबद्दल अधिक विचार करायला भाग पाडले. इंडिया टुडेशी बोलताना मनीषा कोईरालाने तो काळ आठवला आणि म्हणाली, 'माझ्या कारकिर्दीतील खेदाची गोष्ट म्हणजे मी यश चोप्राच्या चित्रपटात काम केले नाही. माझी स्पर्धा माधुरी दीक्षितसोबत होती आणि मी घाबरले होते.  मी तो प्रकल्प नाकारला होता.

मनीषा कोईराला पुढे म्हणाली, 'माझ्या काळातील प्रत्येक अभिनेत्याला, यशजी हयात असताना, त्यांच्यासोबत काम करायचे होते, कारण ते महिलांची सुंदर सादर करत असत. मी यशजींच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना म्हणाले होते की, 'सर, तुमची नायिका बनण्याचे माझे स्वप्न आहे, पण सोलो. तुम्ही मला माधुरीजींसमोर उभे करत आहात. पण माझ्या निर्णयामुळे मी खूप काही गमावले. 

काही वर्षांनंतर माधुरीसोबत केलं कामजरी मनीषा कोईरालाने माधुरीसोबत यश चोप्रा यांचा चित्रपट नाकारला होता, तरीही ती नंतर माधुरी दीक्षितसोबत 'लज्जा' चित्रपटात दिसली. याबद्दल बोलताना मनीषा म्हणाली, 'वर्षांनंतर जेव्हा राजकुमार संतोषीजींनी मला लज्जा चित्रपटाची ऑफर केली तेव्हा मी त्यांना हो म्हणाले. कारण माझ्याकडून यापूर्वी एकदा चूक झाली होती. लज्जाची कथा अप्रतिम होती. हा चित्रपट महिला आणि त्यांच्या समस्यांवर आधारित होता. त्या विषयाने माझ्या मनाचा ठाव घेतला होता. मला वाटतं जेव्हा तुमच्याकडे एक मजबूत दिग्दर्शक असतो आणि तुमचा स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा सुरक्षिततेची भावना असते. याशिवाय, एक मोठा प्रकल्प सोडण्याची चूक मी आधीच केली होती, जी माझ्या करिअरची एक महत्त्वाचा ठरू शकतो. मला वाटले की माझ्या असुरक्षिततेमुळे मला ती चूक पुन्हा करायची नाही. त्यामुळे मी तो चित्रपट केला याचा मला आनंद आहे. मला लज्जा चित्रपट केल्याचा अभिमान आहे.

मनीषा माधुरीबद्दल म्हणाली... मनीषा कोईरालानेही माधुरी दीक्षितचे कौतुक केले. ती म्हणाली की, 'माधुरी जी खूप चांगली व्यक्ती आणि अभिनेत्री आहे. मला असुरक्षित असण्याची गरज नव्हती. मला असं वाटतं की जेव्हा तुमच्यासमोर एक सशक्त कलाकार असतो, तेव्हा तुम्हीही चांगला अभिनय करता. ते तुम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित करतात. ते वय आणि अनुभवातून येते. मला माधुरीजींसोबत काम करायला मजा आली. रेखाजींसोबत काम करताना मला मजा आली. 

'हिरामंडी'बद्दल...

'हिरामंडी'बद्दल बोलायचे झाले तर मनीषा कोईराला या मालिकेतून डिजिटल पदार्पण करत आहे. यामध्ये मनिषासोबत आदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख, शेखर सुमन यांसारखे इतर स्टार्स दिसणार आहेत. अभिनेता फरदीन खानही १४ वर्षांनंतर 'हिरामंडी'मधून सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन करत आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर १ मे रोजी प्रसारित होईल. 

टॅग्स :मनिषा कोईरालासंजय लीला भन्साळीमाधुरी दिक्षितकरिश्मा कपूर