Join us

लोकप्रिय राजस्थानी गायक मांगे खान यांचं निधन, वयाच्या ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:55 IST

कोक स्टुडिओमध्ये त्यांची गाणी गाजली होती. रसिकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकप्रिय राजस्थानी गायक मांगे खान (Mangey Khan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या केवळ ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'अमरस रिकॉर्ड बँड' आणि 'बाडमेर बॉइज' चे ते प्रमुख  गायक होते. राजस्थानी लोकसंगीतामुळे ते देश परदेशात लोकप्रिय झाले. कोक स्टुडिओमधील त्यांची गाणी खूप गाजली. त्यांच्या निधनाने रसिकांना मोठा धक्का बसला आहे.

मांगे खान यांचं १० सप्टेंबर रोजी निधन झालं.  त्यांना लोक प्रेमाने मंगा असं बोलवायचे. मांगणियार समाजातील ते लोकप्रिय आणि टॅलेंटेड वोकलिस्ट होते. नुकतीच त्यांची बायपास सर्जरी झाली होती. आपल्या करिअरमध्ये ते सर्वोच्च शिखरावर होते. देशपरदेशात त्यांचे हाऊसफुल कॉन्सर्ट व्हायचे. त्यांच्या आवाजात एक भारदस्तपणा सोबतच गोडवाही होता. त्यांनी २० देशात किमान २०० तरी कॉन्सर्ट केले. जगातील प्रतिष्ठित roskidle, clockenflap, offset, fmm sines अशा अनेक फेस्टिव्हल्समध्ये त्यांनी परफॉर्म केलं.

सोशल मीडियावर मांगे खान यांना चाहत्यांकडून, रसिकांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मंगा,  सवाई खान आणि मगदा खान ही तिकडी आता तुटली आहे. 'अमरानो','राणाजी','पीर जलानी' अशी अनेक त्यांची गाणी गाजली. कोक स्टुडिओ सीझन ३ मध्येही हा ग्रुप सहभागी झाला होता ज्यामध्ये मांगे खानही होते. 

टॅग्स :संगीतमृत्यूसेलिब्रिटी