मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे. आता मलायका चर्चेत आल्याचं कारणही खास आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाने खान कुटुंबीयांबरोबर नुकतंच रियुनियन केलं. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
मलायकाने नुकतंच तिचं नवं रेस्टॉरंट उघडलं आहे. लेक अरहानसोबत मिळून मलायकाने हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. मलायका-अरहानच्या या रेस्टॉरंटला खान कुटुंबीयांनी भेट दिली. सलीम खान, सलमा खान यांच्यांबरोबर अरबाजही मलायकाच्या या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. मलायका आणि खान कुटुंबीयांच्या रियुनियनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजने गेल्याच वर्षी शूरा खानशी निकाह करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली.