अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अडचणीत सापडली आहे. न्यायालयात हजर न झाल्यास तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघणार आहे. सोमवारी मुंबईच्या मॅजिस्ट्रेट न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मलायकाला याआधी न्यायालयात हजर राहण्याचे अनेकदा आदेश होते मात्र ती हजर राहिली नाही. आता तिला शेवटची संधी देण्यात आली असून याहीवेळी हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येणार आहे. याचा अर्थ तिला लगेच अटक करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. मात्र हे नेमकं प्रकरण काय आहे?
नक्की काय झालं होतं?
हे प्रकरण २०१२ सालचं आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भांडणासंबंधी आहे. यात सैफ अली खान, अमृता अरोरा, तिचा पती शकील आणि त्यांचा मित्र बिलाल अमरोही यांचाही समावेश आहे. हे सर्वजण हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. त्याच दरम्यान एका व्यक्तीसोबत त्यांचं भांडण झालं ते मारामारीपर्यंत गेलं. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. साऊथ आफ्रिकाच्या इकबाल मीर शर्माने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. सैफने त्याच्या नाकावर ठोसा मारला ज्यामुळे ते जखमी झाले असा आरोप शर्माने केला आहे. कुलाबा पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात सैफ, शकील लडाक आणि बिलाल आरोपी असल्याची नोंद आहे. याच घटनेत मलायका साक्षीदार आहे आणि तिला साक्ष देण्यासाठी अनेकदा कोर्टात बोलवण्यात आलं मात्र ती गेली नाही. अमृता अरोराने यावर्षी २९ मार्च रोजी साक्ष दिली होती.
न्यायालयाने याआधी मार्च आणि ८ एप्रिललाही मलायकाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. आता कोर्टाने कडक आदेश देत तिला शेवटची संधी दिली आहे. पुढच्या तारखेला ती हजर झाली नाही तर तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंच निघणार आहे. या प्रकरणात मलायका मुख्य साक्षीदार आहे.