दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. काहीच दिवसांपूर्वी ‘रामायण’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला. या अनोख्या लूकला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘रामायण’चं शूटिंग जेव्हा संपलं होतं तेव्हा या खास क्षणी कलाकारांमध्ये एक भावनिक वातावरण पाहायला मिळालं. चित्रपटात रामाची भूमिका रणबीर कपूर तर लक्ष्मणाची भूमिका अभिनेता रवी दुबे साकारत आहे. शूटिंग संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारून भावनांचा उद्गार केला. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणबीरचं वागणं कसं होतं, यावर रवीने प्रकाश टाकला आहे.
‘रामायण’ सिनेमात लक्ष्मणाची भूमिका साकारणारा अभिनेता रवी दुबे याविषयी म्हणाला की, "रणबीर खूप दयाळू आहे. तो खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यात इतक्या मोठ्या पातळीवर यश बघता तेव्हा तुमच्यावर खूप लोक प्रेम करतात. तुमच्या अभिनयात एक प्रकारचा विश्वास आला असतो. त्यामुळेच अभिनय कसा करायचा, याविषयी तुम्हाला स्वातंत्र्य असतं. रणबीरच्या आत असलेली माणुसकी, दयाळूपणा, मितभाषी स्वभाव आणि भूमिकेसाठी त्याने केलेली तयारी जबरदस्त आहे. माझ्यासाठी तो मोठ्या भावासारखा आहे. मी त्याचा खूप आदर करतो. याशिवाय त्याला सन्मानही देतो."
शेवटच्या दिवशी रणबीरने काय केलं?
अशाप्रकारे ‘रामायण’ सिनेमातील लक्ष्मणाने रणबीरविषयी खुलासा केला. सिनेमाच्या शेवटच्या दिवशी सेटवर रणबीर कपूरने संपूर्ण टीमसमोर एक भावनिक भाषण केलं. “रामाच्या भूमिकेसाठी काम करणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं आणि पवित्र काम होतं,” असं रणबीरने सांगितलं. त्याने सहकलाकार रवी दुबे, साई पल्लवी, यश आणि इतर संपूर्ण टीमचे आभार मानले. रणबीरच्या भाषणाने उपस्थित सर्वांना भावनिक केलं.
‘रामायण’ या महाकाव्यावर आधारित हा सिनेमा तीन भागांत तयार होत असून, पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण) आणि सनी देओल (हनुमान) यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून, भव्य VFX आणि भकास अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट एक वैश्विक अनुभव ठरणार आहे.