बॉलिवूडमधले सध्या सीक्वलची रांगच लागली आहे. हाऊसफूल, धमाल यासोबतच हृतिक रोशनच्या क्रिश सिनेमाच्या पुढच्या भागाचीदेखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या चौथ्या भागाची चर्चा सुरू आहे. या सिनेमातून हृतिक रोशन दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. हृतिकसोबत या सिनेमात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
'कोई मिल गया'मधील जादूने सगळ्यांची मनं जिंकली होती. मात्र या सिनेमाच्या पुढच्या सिक्वेलमध्ये जादू दिसला नव्हता. आता 'क्रिश ४'मध्ये जादूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिशसोबतच जादूही पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच हृतिकसोबत मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसणार असल्याची माहिती पिंकविलाच्या सूत्रांनी दिली आहे. याआधी अग्नीपथ, क्रिश आणि क्रिश ३मध्ये प्रियांका आणि हृतिक रोशन एकत्र दिसले होते. आता पुन्हा त्यांना स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
'क्रिश ४'मध्ये प्रियांका चोप्रासोबतच अभिनेत्री प्रिती झिंटादेखील दिसणार आहे. यामध्ये हृतिक रोशन त्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. 'क्रिश ४'ची कथा टाइम ट्रॅव्हलवर आधारित असणार आहे. 'अव्हेंजर्स'प्रमाणेच सिनेमा बनवण्यात येणार आहे. 'क्रिश ४' २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.