Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोलमाल सिनेमातल्या अभिनेत्यावर आली होती धाब्यावर काम करण्याची वेळ,पालटले नशीब, आज आहे लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 11:58 IST

संजय मिश्रा यांनी शंभराहून अधिक सिनेमा केल्यानंतरही त्यांना हवे तसे यश मिळाले नव्हते, धाब्यावर काम करत असतानाही त्यांना कोणीच ओळखायचे नाही.

तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते. हे सिद्ध करून दाखवलंय अभिनेते संजय मिश्रा यांनी. मिळेल त्या भूमिका साकारत आज बॉलीवुमध्ये अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संजय मिश्रा हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक, विनोदी कलाकार म्हणूनही आज त्यांची ओळख आहे.पण संघर्ष त्यांच्या वाट्यालाही आला. एकवेळ अशी होती की, अभिनय सोडून त्यांना ऋषिकेशला जावे लागले होते. दोन पैसे कमावता यावे यासाठी त्यांनी एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली होती.

संजय मिश्रा यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता. दुःखातून सावरणे त्यांना कठिण जात होते. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर संजय मिश्रा एकटे पडले होते. कामातही त्यांचे मन लागत नव्हते. मुंबईत राहण्याचीही इच्छा नव्हती.अखेर त्यांनी मुंबई सोडून ऋषिकेशमध्येच काम करण्याचा निर्णय घेतलला होता. एका ढाब्यावर काम करायला सुरुवात केली होती. 

विशेष म्हणजे शंभराहून अधिक सिनेमा केल्यानंतरही त्यांना हवे तसे यश मिळाले नव्हते, धाब्यावर काम करत असतानाही त्यांना कोणीच ओळखायचे नाही. काही दिवस त्यांनी असेच धाब्यावर काम करणे सुरु ठेवले. मात्र रोहित शेट्टीने त्यांना मदतीचा हात दिला. रोहित शेट्टीमुळेच त्यांना पुन्हा बॉलिवूडमध्ये परतण्याची संधी मिळाली.

यापूर्वीच संजय यांनी रोहित शेट्टीचा सिनेमा  ‘गोलमाल’ मध्ये काम केले होते. त्यामुळे पुढचा सिनेमा  ‘ऑल द बेस्ट’ साठीही संजय मिश्राचा विचार रोहित शेट्टीने केला आणि  त्यानंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिले नाही. नशीब क्षणात पालटू शकतं हे झगमगत्या दुनियेत पुन्हा सिद्ध झाले. 

आज कोट्यावधी संपत्तीचे मालक संजय मिश्रा आहेत. पटना आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये त्यांचे आलिशान फ्लट आहेत. फॉर्च्युनर आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्यांचे त्यांच्याकडे कलेक्शन आहे. जवळपास २० कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असणारे संजय मिश्रा आज आलिशान आयुष्य जगत आहेत.

टॅग्स :संजय मिश्रारोहित शेट्टी