चाहत्यांचं लाडकं कपल सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी (Siddharth Malhotra-Kiara Advani) आईबाबा झाले आहेत. कियाराने गोंडस मुलीला जन्म दिल्याने दोघांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. सिड-कियाराच्या आयुष्यात आलेल्या चिमुकलीचं आता घरी आगमन झालं आहे. नुकतंच कियारा आणि बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून सिद्धार्थ बायको आणि लेकीला घेऊन घरी पोहोचला. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लेकीला घेऊन घरी आले आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांच्या कारला पापाराझींनी घेरलं. बाळाची एक झलक पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली. मात्र त्यांच्या कारला काळी काच असल्याने त्यांचे चेहरे दिसले नाहीत. तसंच सिद्धार्थ-कियाराने पापाराझींना नो फोटो अशी विनंतीही केली आहे. त्यामुळे त्यांच्या गोंडस मुलीची झलक आताच चाहत्यांना पाहणं शक्य होणार नाही. यामुळे चाहत्यांचा थोडा हिरमोड झाला आहे.
कियाराने दिलेल्या गुडन्यूजनंतर अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. तसंच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सिद्धार्थसोबत पदार्पण करणारे 'स्टुडंट्स' आलिया भट आणि वरुण धवन यांनाही एक मुलगीच आहे. त्यामुळे कियाराला मुलगी झाल्यानंतर सोशल मीडियावर 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सर्व स्टुडंट्सना मुलगी झाली हे ट्रेंड होत होतं.