Kartik Aaryan Meets Rajasthan Cm: अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्यानं मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कार्तिक आर्यन सध्या राजस्थानमध्ये आहे. नुकतीच त्यानं मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांशी हसत हसत बोलत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि कार्तिक आर्यन यांनी राज्यातील सांस्कृतिक वारसा, पर्यटन स्थळे आणि चित्रपट निर्मितीच्या शक्यतांवर चर्चा केली. या भेटीनंतर कार्तिक आर्यन राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.
कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटात दिसणार आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे देखील कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. 'पती पत्नी और वो' या चित्रपटानंतर हा दोन्ही स्टार्सचा एकत्र दुसरा चित्रपट असेल. 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहे. समीर विद्वांस त्याचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिककडे अनुराग बसू यांचा एक रोमँटिक संगीतमय चित्रपट देखील आहे, ज्याचे नाव 'आशिकी ३' असे आहे.