Kareena Kapoor: बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून करीना कपूर आणि सैफ अली खान या दोघांकडे पाहिले जाते. वयाने सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. दोघांचे धर्म वेगवेगळे होते. मात्र दोघांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात दोघांचे लग्न लावून दिलं. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. मात्र, या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली, तेव्हा अक्षय कुमारनं काय प्रतिक्रिया दिली होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? करीनापासून सावध राहण्याचा इशारा अक्षयनं सैफला दिला होता.
सैफ आणि करीनाची पहिली भेट २००३ मध्ये जे.पी.दत्ता यांच्या 'एल. ओ. सी कारगिल' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी झाली होते. त्यानंतर २००६ साली या दोघांनी विशाल भारद्वाजच्या 'ओंकारा' सिनेमात एकत्र काम केले होते. मात्र त्यावेळी हे दोघे एकमेकांबरोबर डेटिंग करत नव्हते. यानंतर त्यांना पुन्हा टशन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा सैफ पूर्णपणे करीनावर लट्टू झाला होता. त्याला कळले होते की करीनावर त्याचे खूप प्रेम आहे आणि मग त्याने तिला प्रपोझ केलं.
टशन चित्रपटाच्या सेटवर सैफ आणि करीनामधील जवळीक वाढल्याचं अक्षयच्या लक्षात आलं होतं. तेव्हा त्यानं सैफला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेबद्दल स्वतः करीना कपूरने एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाशी बोलताना सांगितलं आहे. ती म्हणाली, "जेव्हा सैफ आणि अक्षय बोलत होते, तेव्हा अचानक त्याला सैफ आणि माझ्यातील प्रेम जाणवलं . अशा परिस्थितीत अक्षयने सैफला बाजूला घेतलं आणि त्याला समजावून सांगितलं, या मुलीपासून तू सावध राहा, कारण या धोकादायक मुली आहेत. या धोकादायक कुटुंबातील आहेत आणि मी त्यांना ओळखतो, म्हणूनच मी तुला सावध राहायला सांगतोय". करीना ही सैफचं हृदय तोडेल अशी भीती अक्षयला होती.
करीनाने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा ती तिच्या कारकिर्दीच्या कठीण टप्प्यातून जात होती, तेव्हा सैफ तिच्या आयुष्यात आला. सैफने तिची काळजी घेतली. करीना म्हणाली, "लडाख आणि जैसलमेरमध्ये शूटिंग करताना आम्ही दोघेही एकटे वेळ घालवण्यासाठी अनेकदा लांब बाईक राईडवर जायचो. आम्ही त्या ठिकाणाचे सौंदर्य अनुभवले आणि एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो आणि लवकरच आमच्यात एक घट्ट नातं निर्माण झालं".