Kareena Kapoor Birthday : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करीना कपूर खान. आज बॉलिवूडची 'बेबो' आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अनोख्या स्टाईलने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त एक रंजक गोष्ट समोर आली आहे. कोट्यवधी चाहते ज्या अभिनेत्रीला पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत, ती अभिनेत्री स्वतःच तिचे चित्रपट पाहत नाही. करीना कपूरने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला होता.
करीना तिच्या एका सिनेमासाठी कोटी रुपये मानधन घेते. जीव ओतून काम करते. पण तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर ती पाहात नाही. करीनानं स्वत: एका मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं होतं. 'बेबो' स्वत:चेच चित्रपट पाहत नाही, हे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली होती, की तिला स्वतःला पडद्यावर पाहणे आवडत नाही, कारण यामुळे ती घाबरते आणि जास्त विचार करते. म्हणूनच ती तिची बहीण करिश्मा आणि आई बबिता यांना तिचे चित्रपट पाहण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी सांगते. करीना स्वतःचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी पाहते, जेणेकरून ती अधिक सहजपणे चित्रपट पाहू शकेल.
२१ सप्टेंबर १९८० रोजी जन्मलेल्या करीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले आहे. तिने २००० साली 'रिफ्यूजी' या चित्रपटातून करियरची सुरुवात केली. त्यानंतर 'कभी खुशी कभी गम', 'जब वी मेट', '३ इडियट्स' आणि 'बजरंगी भाईजान' यांसारख्या चित्रपटांनी तिला प्रचंड यश दिले. तसेच 'ओमकारा' आणि 'उडता पंजाब' सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केले. लग्न आणि मुले झाल्यानंतरही, करीनाने तिच्या अभिनयासोबत तडजोड केली नाही. करीना आपल्या दमदार अभिनयाने आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. अलिकडेच ती 'क्रू' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसली होती.