टेलिव्हिजनवरील अनेक मालिका, रिअॅलिटी शोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. रिअॅलिटी शोची कमाई आणि प्रेक्षकांच्या संख्येनं बॉलिवूड सिनेमांनाही मागे टाकलं आहे. 'रिअॅलिटी शो'चे होस्टदेखील मोठं मानधन घेतात. महानायक अमिताभ बच्चन, कपिल शर्मा हे लोकप्रिय होस्ट आहेत. मात्र, त्यांच्याही पुढे जाणारा एक सुपरस्टार आहे जो, गेल्या १५ वर्षांपासून आपलं वर्चस्व टिकवून आहे. हा अभिनेता एका महिन्यासाठी तब्बल ६० कोटींचं मानधन घेतो. त्याच्या होस्टिंगसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके पडतात.
अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये आपल्या दमदार होस्टिंगने चाहत्यांची मनं जिंकत आहेत. तसेच कपिल शर्मा देखील आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. पण होस्टिंग फीच्या बाबतीत एका अभिनेत्यानं या दोघांनाही मागे टाकलं आहे. तो म्हणजे सर्वांचा लाडका सलमान खान (Salman Khan). तो सर्वाधिक महागडा होस्ट आहे.
२०१० पासून सलमान खान रिअॅलिटी शो 'बिग बॉस' होस्ट करत आहे. चाहत्यांना त्याचं होस्टिंग प्रचंड आवडतं आणि त्यामुळेच निर्माते त्याला जबरदस्त मानधन देतात. हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, सलमान खान 'बिग बॉस'च्या एका महिन्याच्या होस्टिंगसाठी तब्बल ६० कोटी रुपये फी घेतो. आजपर्यंत कोणत्याही टीव्ही स्टारने घेतलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. यामुळे सलमान केवळ बॉलिवूडमधीलच नव्हे, तर टीव्ही इंडस्ट्रीतीलही सर्वात महागडा आणि लोकप्रिय होस्ट ठरतो.
बिग बॉस १९' सुरु कधी होणार?
सध्या सलमान खान 'बिग बॉस'च्या १९ व्या सीझनसाठी चर्चेत आहे. लवकरच 'बिग बॉस सीझन १९' येणार आहे. जूनच्या अखेरीस 'बिग बॉस १९' शोच्या पहिल्या प्रोमोचे शूटिंग करणार असून नवीन सीझनचा ग्रँड प्रीमियर जुलै २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धक म्हणून कोण सहभागी असणार याशिवाय नवीन सीझनची थीम काय असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.