Join us
Daily Top 2Weekly Top 5

"चित्रपटांवर बंदी घालणे चुकीचे" 'धुरंधर'चा उल्लेख करत बॉलिवूडमधील 'बॉयकॉट' ट्रेंडवर कंगना म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:55 IST

चित्रपटांवर बहिष्कार टाकून समाजात कटुता निर्माण करू नका, असे आवाहन कंगनाने केले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. अभिनेता रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. पण, दुसरीकडे काही जण चित्रपटावर टीका करताना दिसले. 'धुरंधर' चित्रपटाला 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं. अशातच आता आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाणारी 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणौत हिने यावर भाष्य केलं आहे. चित्रपटांवर बहिष्कार टाकून समाजात कटुता निर्माण करू नका, असे आवाहन तिने केले आहे.

एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "कोणताही कलाप्रकार असो, मग ते पुस्तक असो किंवा चित्रपट, त्यांनी समाजात संवाद निर्माण केला पाहिजे. एखाद्या चित्रपटाच्या विचारांना विरोध करणे चुकीचे नाही, पण त्यावर पूर्णपणे बंदी घालणे किंवा त्याचा बहिष्कार करणे हे मला पटत नाही". कंगनाच्या मते, प्रेक्षक चित्रपटांचे कौतुक करत असताना अनावश्यक टीका करून वातावरण खराब करणे अयोग्य आहे.

कंगनाने यावेळी राष्ट्रवादावर आधारित चित्रपटांचे समर्थन केले. ती म्हणाली, "'धुरंधर' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सारखे चित्रपट राष्ट्रवादाबद्दल भाष्य करतात. तर काही चित्रपट जीवनाचे वेगळे पैलू दाखवतात. कलेकडे केवळ कला म्हणूनच पाहिले पाहिजे आणि समाजातील दोन्ही प्रवाहांवर चर्चा होणे गरजेचे आहे. बंदीमुळे ही चर्चा थांबते, जे लोकशाहीसाठी चांगले नाही", असे तिचे मत आहे.

कंगनाची 'हॉलिवूड' वारी? कंगनाने तिच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांबद्दलही मोठे संकेत दिले आहेत. तिला हॉलिवूडमधून काही ऑफर्स मिळाल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावर बोलताना ती म्हणाली, "हो, मला काही हॉलिवूड प्रोजेक्ट्स ऑफर झाले आहेत. मात्र, वेळ आणि माझी आवड पाहूनच मी त्याबद्दल अंतिम निर्णय घेईन".

English
हिंदी सारांश
Web Title : Banning films wrong: Kangana on boycott trend, mentions 'Dhurandhar'.

Web Summary : Kangana Ranaut opposes film boycotts, emphasizing art should foster dialogue, not division. She defended nationalistic films like 'Dhurandhar,' advocating open discussion over censorship, crucial for democracy. Kangana also hinted at potential Hollywood projects.
टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड