Join us

देशाचा पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतेय कंगना रणौत? म्हणाली, "इमर्जन्सी सिनेमात पंतप्रधानांची भूमिका साकारल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 08:55 IST

कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं. आता ती पंतप्रधान होण्याची स्वप्न बघत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठीदेखील ओळखली जाते. समजातील घडामोडी आणि राजकारणाबद्दलही अनेकदा कंगना सोशल मीडियातून तिचं मत व्यक्त करताना दिसते. अनेकदा कंगनाच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झालेला आहे. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं. आता ती पंतप्रधान होण्याची स्वप्न बघत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

कंगनाने नुकतीच 'रजाकार : द सायलेंट जेनोसाइड ऑफ हैदराबाद' या तेलुगु सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती. या दरम्यान कंगनाला "तुम्ही कधी देशाचा पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघितलं आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगनाने मजेशीर उत्तर दिलं. कंगना म्हणाली, "इमर्जन्सी या माझ्या सिनेमाचं शूटिंग नुकतंच संपलं आहे. त्या सिनेमात मला पाहिल्यानंतर कोणालाही मला पंतप्रधानांच्या भूमिकेत बघावसं वाटणार नाही." कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही कंगनानेच केलं आहे. 

याआधी कंगनाच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. यावर तिने Xवर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. "मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. मी कोणीही राजकीय व्यक्ती नाही. मला अनेकदा राजकारणात सहभागी होण्यास सांगण्यात आलं. पण, मी कधीच तसं केलं नाही." २०२४ची लोकसभा निवडणूक लढणार का? असं विचारताच कंगनाने "श्रीकृष्णची कृपा असेल तर नक्कीच लढेन", हे उत्तर दिलं होतं. 

टॅग्स :कंगना राणौतपंतप्रधान