बॉलिवूडमध्ये सध्या शूटिंग शिफ्टची चर्चा आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्यातील वादावरुन ही चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दीपिकाने लेकीला जन्म दिला. यानंतर ती वांगा यांच्या 'स्पिरिट' मधून कमबॅक करणार होती. तिने वांगा यांच्यासमोर ८ तास शिफ्टची मागणी केली. तसंच २० कोटींचं मानधन, प्रॉफिट शेअर याही अटी ठेवल्या. वांगा यांनी अटी अमान्य करत तिला सिनेमातून बाहेर काढलं. आता दीपिकाची शिफ्टची मागणी योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे. नुकतंच अभिनेत्री काजोलने (Kajol) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पीटीआयशी बोलताना काजोल म्हणाली, "मी एकावेळी एकाच सिनेमावर काम करते. एका वेळी ४-४ सिनेमे मी कधीच केले नाहीत. एक संपल्यानंतरच मी दुसऱ्या सिनेमाचं काम सुरु करायचे. मी कधीच २०-३० तास काम केलं नाही. एका मर्यादित वेळेतच काम करायचं हे माझं स्पष्ट होतं. यात मला माझ्या आईनेही साथ दिली होती."
ती पुढे म्हणाली, "माझी मुलगी नीसाचा जन्म झाल्यावर मला वर्क लाईफ बॅलन्स करणं अवघड जात होतं. अशा वेळी मला माझा नवरा अजय देवगण आणि इतर निर्मात्यांनीही मदत केली. निर्माते काहीही अडकाठी न घेता माझ्या गरजांप्रमाणे चालायचे. यू मी और हम सिनेमावेळी माझे वडील रुग्णालयात होते. तेव्हा अजय निर्माता होता आणि तो मला लवकर घरी जाण्याची परवानगी द्यायचा. त्यामुळे मला काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल साधता आला."
दीपिका पादुकोण आता ॲटलीच्या सिनेमातून कमबॅक करणार आहे. यात दीपिका जादूगर असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या सिनेमाची घोषणा केली.