Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: "एखादं गाणं ऐकवा ना!" होस्टने विनंती करताच कैलाश खेर भडकले, म्हणतात- "जोकर बनवू नका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 17:02 IST

एका कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने त्यांना गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली, ज्यावर कैलाश खेर प्रचंड संतापले आणि त्यांनी मंचावरच आपली नाराजी व्यक्त केली.

प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे त्यांच्या दमदार आवाजासाठी आणि गाण्यांसाठी जगभर ओळखले जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कैलाश खेर यांचा पारा चढलेला दिसला. एका कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने त्यांना गाण्याच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली, ज्यावर कैलाश खेर प्रचंड संतापले आणि त्यांनी मंचावरच आपली नाराजी व्यक्त केली.

नेमका प्रकार काय घडला?

 दिल्लीत २५ एप्रिल रोजी एक समिट पार पडलं. यात कैलाश खेर उपस्थित होते. त्यावेळी होस्टने त्यांना गाणं गाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमधील या सवयीवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "हीच ती गोष्ट आहे जी मला बदलायची आहे आणि हेच माझ्या मनात आहे. गायक किंवा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन असा नसावा की, 'सर, दोन ओळी गाऊन दाखवा आणि आमचा मूड तयार करा.' हे अत्यंत चुकीचे आहे, अशी विनंतीच करू नका."

पुढे कैलाश यांनी इतर क्षेत्रांतील दिग्गजांची उदाहरणे दिली. ते पुढे म्हणाले, "तुम्ही सचिन तेंडुलकरला कधी असे म्हणाल का की, 'जरा एक सिक्स मारून दाखवा'? या पृथ्वीवर असे कोणीही करत नाही. किंवा तुम्ही एखाद्या भारतीय जवानाला असे म्हणाल का की, 'तुम्ही तैनात राहा आणि एक गोळी झाडून दाखवा'? कृपया असे करू नका. कलाकाराला जोकर बनवू नका."

त्यांनी शेवटी अत्यंत भावुक आवाहन करत म्हटले की, "एका गायकाला फक्त मनोरंजन करणारा समजू नका. कलाकार हे साधक असतात आणि ते आपल्या मनाचे राजे असतात." त्यांच्या या विधानानंतर मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या विधानावर सहमती दर्शवली आहे. कैलाश यांनी कलाकारांच्या स्वाभिमानाबद्दल आवाज उठवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kailash Kher Loses Cool: Don't Make Us Jokers!

Web Summary : Singer Kailash Kher expressed displeasure at a Delhi event when asked to sing impromptu. He criticized the perception of artists as mere entertainers, urging respect for their craft and dignity.
टॅग्स :कैलाश खेरबॉलिवूडसंगीत