अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) वकिलाच्या भूमिकेत पुन्हा मोठ्या पडद्यावर येत आहेत. 'जॉली एलएलबी' या गाजलेल्या फ्रँचायझीचा तिसरा भाग रिलीज होणार आहे. यावेळी कोर्टात सिनेमात अर्शद वारसी विरुद्ध अक्षय कुमार म्हणजे जॉली व्हर्सेस जॉली अशी चुरस रंगणार आहे. तर अभिनेते सौरभ शुक्ला जजच्या भूमिकेत आहेत. दरम्यान सिनेमाचं पहिलं गाणं 'भाई वकील है' (Bhai Vakeel Hai) रिलीज झालं आहे.
भाई वकील है अतिशय मजेशीर गाणं आहे. यामध्ये वकील जगदीश्वर मिश्रा(अक्षय कुमार), वकील जगदीश त्यागी(अर्शद वारसी) आणि जज त्रिपाठी म्हणजेच सौरभ शुक्ला एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा वेगळा स्वॅग, स्टाईल पाहायला मिळत आहे. काळ्या कोटमधील दोन जॉलींमध्ये चुरस रंगली आहे. शेवटी प्रेक्षकांसमोर एकच प्रश्न राहतो तो म्हणजे पहिला क्लाएंट कोणाला मिळणार?'
गाण्याच्या सुरुवातीला, दोन्ही वकील - अॅडव्होकेट जगदीश्वर मिश्रा (अक्षय कुमार) आणि अॅडव्होकेट जगदीश त्यागी (अर्शद वारसी) कोर्टरूममध्ये एकमेकांसमोर उभे आहेत. दोघांनीही काळा कोट घातला असून, त्यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. हे दोघेही 'भाई वकील है' या गाण्यावर एकत्र डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात जज त्रिपाठी म्हणजेच अभिनेते *सौरभ शुक्ला* देखील थिरकताना दिसत आहेत.
अमन पंत यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर केडी यांच्यासोबत मिळून त्यांनी हे गाणं गायलंही आहे. गाण्याचे बोल परधान आणि अखिल तिवारी यांनी लिहिले आहेत.
'जॉली एलएलबी ३' या चित्रपटात हुमा कुरेशी, अमृता राव, आणि गजराज राव यांसारखे दमदार कलाकारही आहेत. सुभाष कपूर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात कोर्टरूम ड्रामा, कॉमेडी आणि सामाजिक संदेश यांचा उत्तम संगम पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.