Join us

"मी चौपाटीवर पहाटे ४ वाजेपर्यंत दारू पीत बसायचो", नशेच्या आहारी गेलेले जॉनी लिव्हर, म्हणाले- "पोलीस आल्यावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:15 IST

मुंबईच्या चौपाटीवर सकाळी ४ वाजेपर्यंत दारू पीत बसायचो, असा धक्कादायक खुलासा जॉनी लिव्हर यांनी केला आहे. 

जॉनी लिव्हर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॉमेडियन. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी यशाचं शिखर गाठलं आहे. पण, करियराच्या शिखरावर असतानाच ते दारूच्या आहारी गेले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वत: जॉनी लिव्हर यांनीच हा खुलासा केला आहे. मुंबईच्या चौपाटीवर सकाळी ४ वाजेपर्यंत दारू पीत बसायचो, असा धक्कादायक खुलासा जॉनी लिव्हर यांनी केला आहे. 

जॉनी लिव्हर यांनी लेक जेमीसोबत सपन वर्माच्या युट्यूब चॅनेला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले, "मी खूप थकायचो. दिवसभर सिनेमाचं शूटिंग आणि रात्री माझे शो असायचे. तेव्हा मी खूप दारूही प्यायचो. त्यामुळे मी खूप थकून जायचो. मी बॅकस्टेजला असा बसायचो जसं काय मी शवासन करतोय. पण, कितीही थकलेलो असलो तरी मी नेहमी परफॉर्म करायचो. माझ्यात काहीच शक्ती राहिलेली नसायची".

"मी लोकांना सांगतो की जास्त दारू पिऊ नको. पण, एक वेळ अशी होती जेव्हा मी सीमा ओलांडली होती. मी दारूडा झालो होतो. चौपाटीवर बसून सकाळी ४ वाजेपर्यंत मी दारू पीत बसायचो. अनेकदा पोलीस यायचे. पण, मला ते ओळखायचे आणि म्हणायेच अरे जॉनी भाई. मग मला ते कारमध्ये बसवायचे जेणेकरून मला सुरक्षितपणे दारू पेता येईल", असंही जॉनी लिव्हर यांनी सांगितलं. 

त्यानंतर जॉनी लिव्हर यांनी दारूचं व्यसन सोडलं असल्याची कबुली दिली. याशिवाय गेल्या २४ वर्षांपासून दारूच्या थेंबालाही हात न लावल्याचं सांगितलं. "यश तुमच्या डोक्यात जाऊन तुम्ही भरकटू शकता. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याशिवाय एकही सिनेमा बनायचा नाही. मी परदेशातही शो करायचो. मी खूप बिझी असायचो. पण, त्यानंतर मी एक निर्णय घेतला. मी दारू पिणं सोडून दिलं. मागच्या २४ वर्षांत मी दारू प्यायलेलो नाही. एक गोष्ट मी गर्वाने सांगू शकतो की मी नशेत कधीच परफॉर्म केलेलं नाही. कधीच शोच्या आधी मी दारू प्यायलेलो नाही", असंही ते म्हणाले. 

टॅग्स :जॉनी लिव्हरसेलिब्रिटी