John Abraham: जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जॉनने मोठं नाव कमावलं आहे. अनेक सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. जॉनचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. जॉनचा नुकताच सत्य घटनेवर आधारित 'द डिप्लोमॅट' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता अभिनेत्यानं नवीकोरी गाडी (John Abraham Buys Mahindra Thar Roxx ) खरेदी केली आहे.
जॉन अब्राहमला गाड्यांची विशेष आवड आहे. आता त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एक जबरदस्त एसयूव्ही महिंद्रा थार रॉक्सची भर पडली आहे. ही सामान्य थार नाही, तर जॉनसाठी खास कस्टमाइज केलेली गाडी आहे. गाडीत प्रवाशांच्या बाजूच्या एसी व्हेंटच्या खाली एक धातूची प्लेट आहे. ज्यावर "मेड फॉर जॉन अब्राहम" असे लिहिलेले आहे. याव्यतिरिक्त, सीटच्या हेडरेस्टवर पिवळ्या रंगात "JA" ही सिग्नेचर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. दमदार Stealth Black कलर आणि शानदार ऑफ-रोडिंग क्षमता असलेली ही SUV एक परफेक्ट मॉडल आहे. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, जॉनच्या थॉर रॉक्स कारची सुरुवातीची किंमत १२.९९ लाख रुपये आहे.
दरम्यान जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' हा सिनेमा जे.पी.सिंग या भारतीय डिप्लोमॅट अधिकाऱ्याने केलेल्या चाणाक्ष आणि साहसी कामगिरीवर हा आधारीत आहे. जे.पी.सिंग यांनी हुशारीचा वापर करुन पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय मुलीला मायदेशी कसं परत आणलं, याची रंजक कहाणी 'द डिप्लोमॅट' सिनेमात बघायला मिळतेय. टी सीरिज, जेए एंटरटेनमेंट, फॉरच्युन पिक्चर्स आणि वकाऊ फिल्म प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. शिवम नायर यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एक पॉलिटिकल थ्रिलर म्हणून हा सिनेमा ओळखला जातोय.