ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या पापाराझींवर रागावण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात त्या पापाराझींना पाहून हसताना दिसत आहेत. त्यांच्या या बदललेल्या स्वभावामुळे नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. कायम पापाराझींना डाफरणाऱ्या, त्यांना सर्वांसमोर ओरडणाऱ्या जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या नवीन कलेक्शनच्या लाँचच्या कार्यक्रमात जया बच्चन पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे पापाराझी उपस्थित होते. पण यावेळी जया बच्चन त्यांच्यावर भडकल्या नाहीत, उलट त्या हसतमुखाने त्यांच्याशी बोलल्या पुढे आल्या आणि फोटोसाठी पोजही दिली.
जया बच्चन यांची प्रतिक्रिया
या वेळी पापाराझींशी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, “अशा कार्यक्रमांमध्ये फोटो काढण्यावर माझा काही आक्षेप नाही. मात्र, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय आणि मला न सांगता जे फोटो काढता ते मला आवडत नाहीत.” त्यांनी हे स्पष्ट केलं की, जेव्हा त्या तयार नसतात आणि त्यांचे फोटो घेतले जातात, तेव्हा त्यांना राग येतो. त्यांनी असंही म्हटलं की, “मी तयार झाल्यावर फोटो काढल्यास मला कोणतीही अडचण नाही.” यावरून त्यांच्या रागामागचं खरं कारण स्पष्ट झालं. अशाप्रकारे जया यांचा हसतानाचा व्हिडीओ बघून नेटकरी थक्क झाले आहेत.
नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया
हा व्हिडीओ जुना असला तरीही जया बच्चन यांचा हा बदललेला स्वभाव पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी कमेंट्समध्ये, ‘आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला?’ असे प्रश्न विचारले. तर काहींनी त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांची बाजू घेतली. जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एकूणच न सांगता आणि नकळत कोणी फोटो काढले तरच जया बच्चन रागावतात, याचा खुलासा सर्वांना झाला आहे. जया बच्चन आपल्याला शेवटी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात अभिनय करताना दिसल्या.