१९७० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक असलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्यातील अफेयरच्या अफवा खूप पसरल्या होत्या. त्यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घातला होता. मात्र, रेखा यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रेमसंबंधांच्या अफवा पसरत असताना बिग बींनी मौन बाळगले होते. दुसरीकडे, रेखा यांनी त्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. १९७८ साली बिग बी आणि रेखा यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'मुकद्दर का सिकंदर' रिलीज झाला. या चित्रपटातील कथानक केवळ चर्चेत आलं नाही तर अभिनेत्री जया बच्चन यांना रडवलं.
रेखा यांनी 'मुकद्दर का सिकंदर'च्या ट्रायल शोची कहाणी सांगितली होती. स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की, त्यांनी प्रोजेक्शन रूममधून ट्रायल शो दरम्यान बच्चन कुटुंबाला पाहिले होते. रेखा यांनी त्या आठवणीबद्दल सांगितले की, संपूर्ण बच्चन कुटुंब 'मुकद्दर का सिकंदर'चा ट्रायल शो पाहायला आलं होतं. त्यावेळी मी प्रोजेक्शन रूममधून संपूर्ण कुटुंबाला पाहत होते. जया पुढच्या रांगेत बसल्या होत्या आणि ते (अमिताभ) आणि त्यांचे आई-वडील जया यांच्या मागे रांगेत बसले होते. ते तिला माझ्याइतके स्पष्टपणे पाहू शकले नाहीत आणि आमच्या लव्ह सीन्सदरम्यान मला जया यांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसले होते."
त्यानंतर बिग बींनी घेतला मोठा निर्णय
त्या भावनिक प्रदर्शनानंतर फक्त एका आठवड्याने, रेखा म्हणाल्या की, त्यांना इंडस्ट्रीमध्ये कुजबुज ऐकू आली, अमिताभ यांनी त्यांच्या कामाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. एका आठवड्यानंतर, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण मला सांगत होता की त्यांनी त्यांच्या निर्मात्यांना स्पष्ट केले आहे की, ते माझ्यासोबत काम करणार नाहीत," रेखा यांनी हे स्टारडस्टला सांगितले. हे अनेकांसाठी धक्कादायक होते. अमिताभ आणि रेखा यांनी एकत्र अनेक हिट चित्रपट दिले होते आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. परंतु 'मुकद्दर का सिकंदर'नंतर ते १९८१ मध्ये 'सिलसिला'पर्यंत पुन्हा एकत्र दिसले नाहीत, जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती फिरणाऱ्या अफवांवर आधारीत चित्रपट होता.