काही काळापासून पापाराझी हा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या मागे-पुढे करीत त्यांचे फोटो-व्हिडीओ काढण्याचं काम पापाराझी करतात. मात्र, कधी कधी त्यांच्या असभ्य वर्तणुकीमुळे काही कलाकारही त्यांच्यावर रागावताना किंवा चिडताना दिसतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन.जया बच्चन पापाराझींवर थेट आणि कडक शब्दांत प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखल्या जातात. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात जया बच्चन उपस्थित होत्या. त्या तिथे काही महिलांशी गप्पा मारत असताना पापाराझींनी त्यांना वारंवार फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. सुरुवातीला जया बच्चन यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि त्यांच्याकडे रागाने पाहिले. तरीही पापाराझी थांबले नाहीत, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.
इतक्यात तिथे दिग्दर्शक करण जोहरची एन्ट्री झाली. जया बच्चन करणशी बोलत असतानाही पापाराझी फोटोसाठी ओरडत होते. यावेळी वैतागलेल्या जया बच्चन यांनी त्यांच्याकडे बोट दाखवून सज्जड दम भरला. वातावरण तणावपूर्ण होत असतानाच, करण जोहरने परिस्थिती हाताळत पापाराझींशी विनोद केला. "फोटो मिळाला" असं करण म्हणताच जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरही हसू आलं आणि त्या तिथून निघून गेल्या.
जया बच्चन यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पापाराझींबद्दल अत्यंत परखड मते मांडली होती. त्या म्हणाल्या होत्या, "माझं माध्यमांशी नातं अगदीच उत्तम आहे. पण पापाराझींशी माझं नातंच नाही. हे कोण लोक आहेत? हे देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षित आहेत का? फक्त यूट्यूब किंवा इतर सोशल प्लॅटफॉर्मवर काही टाकतात म्हणून यांना तुम्ही मीडिया म्हणता?".
पुढे त्या म्हणाल्या होत्या, "माझे वडील पत्रकार होते. म्हणून मला खऱ्या पत्रकारांबद्दल फार आदर आहे. पण हे बाहेर उभे असलेले, टाईट पँट घालून हातात फक्त मोबाईल घेणारे लोक, फक्त मोबाईल आहे म्हणून कोणाचाही फोटो काढायचा आणि वाटेल ते बोलायचं? कोण आहेत हे? कुठून येतात? त्यांचं शिक्षण काय, त्यांची पार्श्वभूमी काय? हे लोक आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार?". जया बच्चन यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले होते. काहींनी त्यांच्या शिस्तीचे आणि खासगी आयुष्याच्या गोपनीयतेचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्या स्वभावाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
Web Summary : Jaya Bachchan rebuked paparazzi for intruding at an event in Mumbai. Irritated by constant photo requests, she scolded them. Karan Johar lightened the tense situation with humor.
Web Summary : मुंबई में एक कार्यक्रम में जया बच्चन ने पैपराज़ी को फटकारा। लगातार तस्वीरों की मांग से नाराज़ होकर उन्हें डांटा। करण जौहर ने हास्य से तनावपूर्ण स्थिति को हल्का कर दिया।