धनगर कुटुंबात जन्माला आलेला बिरदेव डोणे (Birdev Siddappa Done) आयपीएस झाला आहे. त्याच्या या कर्तृत्वाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. बिरदेवचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अनेकजण त्याला त्याच्या गावी भेटायला जात असून बुके घेऊन जात आहेत. मात्र बिरदेवने 'बुके नको बुकं द्या' असं आवाहन केलं. बिरदेवच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने आपल्या संस्थेमार्फत बिरदेवला १ हजार पुस्तकं भेट दिली आहेत.
मेंढपाळाचा मुलगा असलेल्या बिरदेव डोणेची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. स्वत:च्या हिंमतीवर आधी पुणे आणि मग दिल्लीत तयारी करुन तो परीक्षा उत्तीर्ण झाला. आज तो आयपीएस बिरदेव डोणे आहे. अतिशय खडतर वाट असतानाही त्याने आपलं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. आज त्याचा सगळीकडे सत्कार होत आहे. मात्र 'सत्कार करताना मला बुके नको बुक द्या' असं तो म्हणाला. पुस्तकं जमा करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तयार करायची त्याची इच्छा आहे. बिरदेवच्या या आवाहनाला बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने प्रतिसाद दिला. त्याने त्याच्या संस्थेमार्फत बिरदेवच्या गावी तब्बल १ हजार पुस्तकं पाठवली आहेत.
यूपीएससी परीक्षेचा निकाल २२ एप्रिलला दुपारी लागला. त्या दिवशी बिरदेव बेळगावजवळील भवानीनगर येथे माळावर आपल्या मामाच्या बकऱ्यांत रमला होता. गावकऱ्यांनी फोनवरून बिरदेवचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी बिरदेवच्या स्वागताची तयारी सुरू केली, पण बिरदेवने सैन्यात असलेला भाऊ वासुदेव येत नाही, तोपर्यंत गावात येणार नसल्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारी बिरदेव भावासह गावात आला आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.