Join us

‘धडक’च्या सुरूवातीला होणार श्रीदेवींचे दर्शन, रिलीजच्या दोन दिवसांपूर्वी झाला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 19:24 IST

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आपली मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन किती उत्साहित होत्या, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. 

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आपली मुलगी जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन किती उत्साहित होत्या, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. जान्हवीने ‘धडक’ या डेब्यू सिनेमाचे शूटींग सुरू केले तेव्हा सुरूवातीला अनेक दिवस श्रीदेवी तिच्यासोबत सेटवर जायच्या. खरे तर जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करू नये, अशी श्रीदेवींची इच्छा होती. पण जान्हवीने करिअरसाठी बॉलिवूडची निवड केल्यावर श्रीदेवींनी मुलीच्या या निर्णयाचा आदर करत, तिला सगळी मुभा दिली. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडच्या डेब्यूपूर्वी अगदी तिच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून तर तिच्या लूक्सपर्यंत सगळ्या गोष्टींकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. जान्हवीचे स्टारडम पाहण्याची त्यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लेकीचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला. येत्या २० तारखेला ‘धडक’ रिलीज होतोय. निश्चितपणे जान्हवीचं नाही तर अख्ख्या कपूर कुटुंबासाठी हा भावूक क्षण आहे. किंबहुना प्रेक्षकांसाठीही हा भावूक करणारा क्षण असणार आहे. कारण ‘धडक’च्या सुरूवातीला श्रीदेवींचे दर्शन होणार आहे.

 बॉलिवूड लाईफ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जान्हवीने आपल्या आईला एक पत्र लिहिले आहे. हे पत्र चित्रपटाच्या सुरूवातीला दाखवले जाईल. सोबतचं श्रीदेवी आणि जान्हवीचा एक फोटोही दाखवला जाईल. जान्हवी आपला डेब्यू सिनेमा आपल्या आईला समर्पित करू इच्छिते. निर्मात्यांनी तिची ही इच्छा पूर्ण केली आहे.

टॅग्स :जान्हवी कपूर