अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवीने 'धडक' सिनेमातून पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडच नाही तर साऊथ इंडस्ट्रीही गाजवत आहे. जान्हवी आज एक स्टार अभिनेत्री असली तरी ती अनेकदा समाजात घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असते. कल्याणमध्ये एका रिसेप्शन तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी जान्हवीने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर कल्याणच्या तरुणीला मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करत लिहिले, "या माणसाला तात्काळ तुरुंगात पाठवलं पाहिजे. हे असं वागणं योग्य आहे असं कोणाला वाटूच कसं शकतं? तो अशा प्रकारे कोणावर हात उचलू शकतो हे त्याला वाटलंच कसं? कोणत्या प्रकारचं संगोपन तुम्हाला पश्चाताप, अपराधीपणा किंवा माणुसकीच्या भावनेशिवाय अशी विकृती करायला लावतं. तुमचा मेदू अशाप्रकारे चालत असेल तर तुम्ही जगूच कसे शकता? किती लाजिरवाणे आहे. आणि स्वत:चीही लाज वाटते की आपण अशा लोकांवर कडक कारवाईही करु शकत नाही. ही गोष्ट माफीच्या लायकच नाही."
जान्हवीने ही पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. कल्याण मधील या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या गोकुळ झा ला ताब्यात घेण्यात आलं. तर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणात नवी अपडेट समोर आली. पीडित तरुणीने गोकुळ झासोबत असलेल्या एका महिलेच्याच आधी कानशिलात लगावली होती. नंतर गोकुळ झा ने तरुणीला मारहाण केली. मात्र तरी गोकुळ झा च्या वर्तनाचं समर्थन होऊच शकत नाही. सध्या रिसेप्शनिस्ट तरुणीची प्रकृती बरी नाही. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.