Jacqueline Fernandez-Parth Pawar Lalbaugcha Raja: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. सामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळीही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Parth Pawar) यांचे पूत्र पार्थ पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अनेक सेलिब्रिटींनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यात जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार एकत्र दर्शनासाठी आले होते. जॅकलिन यावेळी पारंपारीक वेशभूषेत होती. तिने डोक्यावर ओढणी घेऊन मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं. व्हिडीओमध्ये दिसतं की, दर्शन घेण्यापूर्वी पार्थ पवार त्यांच्या खिशातून काही नोटा काढतात आणि जॅकलिनच्या हातात देतात. त्यानंतर जॅकलिन त्या नोटा लालबागच्या राजाच्या दानपेटीत टाकते. दान दिल्यानंतर दोघांनीही बाप्पाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि तेथून निघाले.
पार्थ पवार यांच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पार्थ पवार यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केलं. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते. पण, शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. जॅकलिनच्या करिअरबाबत बोलायचं झालं तर काही दिवसापूर्वी अक्षय कुमारसोबतच्या मल्टीस्टारर 'हाऊसफुल ५' मध्ये पहायला मिळाली. आता ती अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, दिशा पाटनी आणि इतर कलाकारांसोबतच्या मोठ्या प्रोजेक्ट 'वेलकम टू द जंगल' मध्ये पहायला मिळणार आहे.