गेल्या काही दिवसांपासून मीडिया, पापाराझींवर बरीच टीका होत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून नाजूक आहे. दोन दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांना घरी आणण्यात आलं. आता घरीच त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र दुसरीकडे पापाराझींनी धर्मेंद्र यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर तुडूंब गर्दी केली. याचा देओल कुटुंबाला खूप मनस्ताप झाला. अख्ख्या इंडस्ट्रीतून या प्रकरणी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जॅकी श्रॉफ यांनीही पापाराझींना सुनावलं आहे.
आपला 'भिडू' म्हणजेच अभिनेते जॅकी श्रॉफ कायम मस्तमौला अंदाजात दिसतात. नुकतेच ते विमानतळावर आले होते. पाराराझींना पाहून ते म्हणाले, "तुम लोग बहुत धतिंग करता है हा..कोणाकडेही असं काही लोचा करु नका भिडू. समझ गया ना तुमच्याघरी असं काही झालं तर...बवाल हो जाएगा. तुम लोग मूँह पे आके कॅमेरा ...तू समजलास ना मी काय बोललो?"
जॅकी श्रॉफ यांनी प्रेमाने पण कडक शब्दात पापाराझींना सुनावलं. आजकाल अंत्यसंस्कारालाही पापाराझी झूम करुन फोटो, व्हिडीओ काढतात. याचा कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या काही दिवसात अशा बऱ्याच घटना घडल्या. धर्मेंद्र यांच्या बाबतीतील घटनेत पापाराझींनी मर्यादाच ओलांडली. यावरुन सगळेच टीका करत आहेत.