Join us

मी जिवंत... माझी हत्या झाली नाही...; अभिनेत्री वीणा कपूर यांची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 07:55 IST

त्या हत्या प्रकरणामुळे गैरसमज. दोघींचीही नावे एकसारखी असल्याने गोंधळ उडाला.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपत्तीच्या लोभाने पोटच्या मुलाने वीणा कपूर या ज्येष्ठ नागरिक महिलेची निर्घृण हत्या करत तिचा मृतदेह माथेरानच्या दऱ्याखोऱ्यांत फेकून दिला. गेल्या आठवड्यातील या घटनेने सर्वच जण सुन्न झाले. मात्र, नामसाधर्म्यामुळे या घटनेचा ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अखेरीस गुरुवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात येऊन त्यांना आपण जिवंत असून, मुलाने हत्या केली नसल्याचे ठणकावून सांगावे लागले. 

त्याचे झाले असे की, जुहू हत्या प्रकरणात पोलिसांनी सचिन कपूरला बेड्या ठोकल्या. माथेरानमधून वीणा कपूरचा यांचा मृतदेहही ताब्यात घेतला. दुसरीकडे गोरेगावमध्ये वीणा कपूर देखील मुलासोबत राहण्यास आहेत. दोघींचीही नावे एकसारखी असल्याने गोंधळ उडाला आणि मृत महिला या ७४ वर्षीय अभिनेत्री वीणा कपूर असल्याचे वृत्त पसरले होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली. तसेच त्यांच्या मुलालाही ट्रोल करत शिवीगाळ करणारे फोन सुरू झाले. अखेर, अभिनेत्री वीणा कपूर यांनी ‘मै जिंदा हूँ...’ म्हणत थेट पोलिस ठाणे गाठल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अखेरीस त्यांच्या हत्येच्या वृत्ताला पूर्णविराम मिळाला. वीणा कपूर यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवत तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी दिली.  

चुकीच्या फोटोमुळे गोंधळ अभिनेत्री वीणा कपूर आणि जुहू हत्या प्रकरणातील वीणा कपूर वेगळ्या आहेत. काही जणांनी चुकीचा फोटो वापरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे पोलिस उपायुक्त अनिल पारसकर यांनी नमूद केले. 

 मी जिवंत आहे. मुलाने माझी हत्या केलेली नाही. सोशल मीडियावर चुकीचे वृत्त पसरवले जात आहे. मी अस्वस्थ आहे.  लोक श्रद्धांजली देत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाही. माझ्या निधनाचे वृत्त ही केवळ अफवा आहे. अफवांमुळे काम मिळणे बंद झाले आहे.  माझ्या मुलालाही अपमानित करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे. यावर योग्य कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :पोलिस