हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात गाजलेल्या फ्रँचायझींपैकी एक म्हणजे 'क्रिश' (Krrish). हृतिक रोशनने (Hrithik Roshan) 'क्रिश'मधून मोठा चाहतावर्ग मिळवला. आतापर्यंत सिनेमाचे तीन भाग आले. तर आता याच्या चौथ्या भागाची चर्चा आहे. 'क्रिश ४' कधी येणार याबद्दल मोठं अपडेट आलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शन, निर्मिती कोण करणार याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
राकेश रोशन यांनी काही महिन्यांपूर्वीच दिग्दर्शनातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच क्रिश ४ मोठा सिनेमा असणार आहे आणि बजेटमुळे सिनेमाला वेळ लागत असल्याचं ते म्हणाले होते. आता सिनेमाबद्दल अपडेट आलं आहे. आदित्य चोप्रा सिनेमाची निर्मिती करणार आहे. २०२६ मध्ये सिनेमाच्या शूटला सुरुवात होईल. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशन 'क्रिश ४' सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनयासोबतच तो दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे.
'क्रिश ४' ही सुपरहिरो फिल्म आहे. २००३ साली आलेल्या 'कोई मिल गया'चा सीक्वेल 'क्रिश' नावाने आला. २००६ साली तो रिलीज झाला होता. तर २०१३ साली 'क्रिश ३'आला. 'क्रिश'मध्ये प्रियंका चोप्रा मुख्य अभिनेत्री होती. तर 'क्रिश ३' मध्ये कंगना राणौत हृतिकची हिरोईन होती. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत 'क्रिश'ची लोकप्रियता आहे. आता 'क्रिश ४' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.