'हाऊसफुल' फ्रॅन्चायझीचा पाचवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कॉमेडीचा थरार मांडणारा आणि तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल ५' गेल्या आठवड्यात शुक्रवारी(६ जून) सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरमध्येही सिनेमा चांगली कामगिरी करत आहे.
'हाऊसफुल ५'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल ५' सिनेमाने २४ कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर वीकेंडला सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी सिनेमाने ३१ कोटी कमावले तर रविवारी ३२.५ कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल ५' मंडे टेस्टमध्येही पास झाला. या सिनेमाने सोमवारी १३.७६ कोटींचा गल्ला जमवला. तर मंगळवारी ११.२५ कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत 'हाऊसफुल ५' सिनेमाने ११४ कोटींचा बिजनेस केला आहे.
'हाऊसफुल ५' सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमात अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बजावा, नरगिस फाकरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रगंदा सिंह, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रंजीत, सौंदर्या शर्मा, निकितिन धीर आणि आकाशदीप साबिर हे कलाकारही आहेत.