Join us

करिश्मा कपूरचा हा नायक चित्रपटसृष्टीपासून आहे दूर, आता ओळखणे देखील होतंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 20:00 IST

प्रेम कैदी या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

ठळक मुद्दे२०११ मध्ये त्याने गोविंदा स्टारर ‘नॉट एट ४०’मधून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. अखेरीस २०१२ मध्ये आलेल्या ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटात तो झळकला होता.

करिश्मा कपूरसोबत प्रेम कैदी या चित्रपटात आपल्याला हरीश कुमारला पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्याला चॉकलेट हिरो म्हणूनच ओळखले जात होते. याआधी त्याने ‘संसार’ आणि ‘जीवनधारा’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. पण प्रेम कैदी या चित्रपटामुळे तो पहिल्यांदाच नायकाच्या भूमिकेत झळकला. 

हरीश कुमार बॉलिवूडमध्ये त्या अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्यांनी ९० च्या दशकात आपली छाप सोडली होती. मात्र त्यानंतर हरीश कुमार जणू काही इंडस्ट्रीमधून गायबच झाला. हरीशने त्याच्या अभिनयाची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. हिंदी, तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणारा हरीश एकमेव अभिनेता आहे. त्याने बॉलिवूड आणि प्रादेशिक भाषेतील तब्बल 280 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला त्याच्या आंध्रा केसरी या चित्रपटातील अभिनयासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला होता. 

हरीशने त्याच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर हरीश कुमारने वयाच्या पंधराव्या वर्षीच मुख्य अभिनेता म्हणून काम केले. मल्याळम भाषेतील ‘डेजी’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. हरीशने त्याच्या कारकिर्दीत दक्षिणेतील आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. 

हरीशने नाना पाटेकरच्या ‘तिरंगा’ आणि गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटांमध्येही काम केले होते. एकूणच ९० च्या दशकात हरीशने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. परंतु २००१ मध्ये आईच्या निधनानंतर त्याने पडद्यावरून एक्झिट घेतली.

२०११ मध्ये त्याने गोविंदा स्टारर ‘नॉट एट ४०’मधून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा चित्रपट फ्लॉप झाला. अखेरीस २०१२ मध्ये आलेल्या ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटात तो झळकला होता. परंतु हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. हरीश कुमारचे वजन चांगलेच वाढले असून त्याचा लूकही पूर्णपणे बदलला आहे. त्याला आता ओळखणे देखील कठीण जात आहे. याच कारणामुळे त्याला काम मिळणेही बंद झाले असे म्हटले जाते.  

टॅग्स :करिश्मा कपूर