Geeta Basra : भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. साल २०१५ मध्ये ते दोघे लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर गीता बसरा जणू गायबच झाली. तिने २००६ मध्ये 'दिल दिया है'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.गीताने गेल्या काही काळापासून बॉलिवूडपासून अंतर निर्माण केले आहे. मात्र, आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अशातच आता दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून अंतर ठेवण्यामागील खरं कारण सांगितलं.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गीता बसराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. हरभजन सिंगला भेटल्यानंतर, इंडस्ट्रीचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ज्यामुळे तिला अनेक चित्रपट गमवावे लागले, असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं, त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "जेव्हा मी हरभजनला भेटले तेव्हा मी माझ्या फिल्मी कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झाली होती. तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते. शिवाय त्यावेळी लोकांची मानसिकता फार वेगळी होती, जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कोणासोबत दिसलात तर अफवा पसरू लागायच्या. ही विचारसरणी केवळ प्रेक्षकांपुरती मर्यादित नव्हती, तर निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचाही असाच विचार होता."
त्यानंतर पुढे गीता बसराने सांगितलं, "मी भज्जीला भेटले आणि त्यानंतर मी चार चित्रपट गमावले. कारण, लोकांना वाटलं की मी लग्न करणार आहे. शिवाय इंडस्ट्रीत माझा कोणीही गॉडफादर नव्हता, त्यामुळे मी लोकांना समजावून सांगणं सुद्धा कठीण होतं. पण, आता काळ बदलला आहे. आजकाल, तुम्ही विवाहित आहात का? किंवा मुले आहेत, याची कोणालाही काही पडलेलं नसतं. पडद्यावर तुमचं काम महत्त्वाचं आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
२०१५ मध्ये हरभजन सिंग आणि गीता बसराने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं आणि या दोघांना आता दोन मुली आहेत. हरभजन आणि गीताने जवळपास सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा विचार केला.