Join us

अखेर ३५ वर्षांचा दुरावा संपला! करीनाचे पालक रणधीर कपूर आणि बबिता राहणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 12:19 IST

Babita And Randhir Kapoor : रणधीर कपूर आणि बबिता घटस्फोट न घेता मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि करिश्मा कपूर (Karisma Kapoor) यांच्या आई-वडीलांच्या नात्यातील दुरावा कायमचा दूर झाला आहे आणि आता ते एकत्र राहू लागले आहेत. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) व अभिनेत्री बबिता (Babita) यांचे लव्हमॅरेज आहे. ते दोघे मागच्या ३५ वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. परंतु आता मात्र दोघेही एकत्र आले आहेत.

रणधीर कपूर आणि बबिता यांनी १९७१ मध्ये लग्न केले आणि नंतर १९८८ मध्ये ते विभक्त झाले होते. आता तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले आहेत. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. आता पुन्हा एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खूश नाहीत तर त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बबिता सर्व सामान घेऊन रणधीर यांच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी गेल्या आहेत.

आई वडिल एकत्र राहणार असल्यामुळे त्यांच्या मुली करीना आणि करिश्माही आनंदी आहेत. कारण आता उतारवयात दोघंही एकत्र राहतील आणि एकमेकांची काळजी घेतील. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले होते. अशा परिस्थितीत ३५ वर्षांनंतर त्यांचे पुन्हा एकत्र येणे ही मोठी बाब आहे. रणधीर कपूर यांची तब्येत आता फार चांगली नसते, त्यामुळे बबिता त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेता येईल.

रणधीर कपूर आणि बबिता यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली.  ऐंशीच्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख खाली घसरत होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि दारू पिण्यास सुरुवात केली. दारू पिण्याच्या सवयीमुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाले. तसेच मुलींनी चित्रपटात काम करावे, हेही रणधीर यांना मंजूर नव्हते, त्यामुळेही त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. अशातच १९८८ साली त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि बबिता यांनी आपल्या दोन्ही मुलींसोबत वेगळे राहायला सुरुवात केली होती. आता तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र राहणार आहेत.

टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूररणधीर कपूरबबिता