Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉरर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामसे बंधूंवर पसरली शोककळा, त्यांच्यातील या भावाचे झाले निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:50 IST

तुलसी, कुमार, श्याम, केशू, अर्जुन, गंगू, किरण असे सात रामसे बंधू असून या सातही जणांनी अनेक चांगले चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

ठळक मुद्देश्याम रामसे हे 67 वर्षांचे होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सत्तरीचे आणि ऐंशीचे दशक रामसे बंधूंनी गाजवले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

प्रसिद्ध निर्माते श्याम रामसे यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. प्रसिद्ध रामसे बंधूमधील ते एक होते. त्यांचे भाचे अमित रामसे यांनी ही दुःखद बातमी मीडियाला दिली. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीमध्ये आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

श्याम रामसे हे 67 वर्षांचे होते. त्यांना गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सत्तरीचे आणि ऐंशीचे दशक रामसे बंधूंनी गाजवले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी खूपच कमी बजेटमध्ये अतिशय चांगले हॉरर चित्रपट बनवले होते. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. तुलसी, कुमार, श्याम, केशू, अर्जुन, गंगू, किरण असे सात रामसे बंधू असून या सातही जणांनी अनेक चांगले चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अंधेरा, पुरानी हवेली, कोई है, वीराणा, पुराना मंदिर, दो गझ जमीन के नीचे, बंद दरवाजा, सबूत यांसारखे अनेक रामसे बंधूंचे चित्रपट गाजले आहेत. कोई है हा रामसे बंधूंचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.

श्याम यांनी त्यांचे बंधू तुलसी यांच्यासोबत छोट्या पडद्यावर देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले होते. त्यांच्या अनेक हॉरर मालिका त्या काळात गाजल्या होत्या. झी हॉरर या मालिकेला तर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तुलसी रामसे यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाले होते. तुलसी रामसे हे 77 वर्षांचे होते. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

 

टॅग्स :बॉलिवूड