Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मैं अटल हूं’ चित्रपटात झळकणार 'ही' प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; सुषमा स्वराज यांची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 18:08 IST

१९ जानेवारी २०२४ रोजी मै अटल हूं सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

‘मिर्झापूर’ फेम ‘कालिन भैया’ अर्थात अभिनेते म्हणून पंकज त्रिपाठी हे आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा स्वतंत्र असा एक मोठा चाहतावर्ग आहे. आगामी ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी चर्चेत आहेत. 'मै अटल हूं' सिनेमातील पंकज त्रिपाठींच्या लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या बॉलिवूड सिनेमात मराठी अभिनेत्री महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी जाधव यानं केलंय. या सिनेमात माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भूमिकेत असलेल्या मराठमोळी अभिनेत्री गौरी सुखटणकर हिनं विशेष लक्ष वेधलं आहे.  सुषमा स्वराज यांच्या भूमिकेविषयी गौरी म्हणाली, मी सुषमा स्वराज होऊ शकत नाही. मात्र त्यांची प्रतिमा पडद्यावर हुबेहुब साकारण्याचा आमाणिक प्रयत्न केला आहे. भूमिका मिळाल्यानंतर मोठी जबाबदारी आल्यासारखं वाटलं. पण तेवढाच आनंदही होता, असे तिने महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले.

गौरी सुखटणकरने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिकेतही तिने काम केले आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांचं ‘गांधी विरुद्ध सावरकर’, तर ‘लहानपण देगा देवा’  आणि ‘हा सागरी किनारा’ या नाटकांमध्ये तिने काम केलं आहे. शिवाय, तिने ‘हर हर महादेव’ हा चित्रपट केला. मुंबईतील पोदार कॉलेजातून बी.कॉम. केल्यावर तिने कायद्याचा अभ्यास करू पाहिला. परंतु अभिनयाखातर तो सोडला. तिने सुरुवातीला छोट्यामोठ्या भूमिका साकारल्या आहेत. 

१९ जानेवारी २०२४ रोजी मै अटल हूं सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट बघावी लागणार आहे.  

टॅग्स :पंकज त्रिपाठीमराठीसेलिब्रिटीसिनेमा