अनेक मराठी-हिंदी चित्रपटात कधी गंभीर तर कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) हे एक हरहुन्नरी कलाकार. मकरंद देशपांडे छोट्या छोट्या भूमिकात दिसले पण प्रत्येक भूमिकेत स्वत:ची छाप सोडून गेलेत. मग तो शाहरूखचा ‘स्वदेश’ असो किंवा ‘आरआरआर’मधील छोटासा रोल. लवकरच मकरंद देशपांडे ‘शूरवीर’ (Shoorveer) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. यात त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या निमित्ताने मकरंद यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तमाम कलाकारांना एक मोलाचा सल्ला दिला.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सांप्रदायिक तणावावर भाष्य केलं. ‘देशात शांतता नांदावी, सांप्रदायिक सौख्य नांदावं यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी, कलाकाराने आपल्या जबाबदारीचं भान राखणं गरजेचं आहे. सांप्रदायिक तणावाच्या स्थितीत आपल्याला बुद्धिचा वापर करायला हवा. आपण कोणत्याही बाजूने नाही. फक्त देशातील कायद्याच्या बाजूने आहोत आणि आपल्याला फक्त त्याचीच बाजू घ्यायला हवी. मुद्दा कुठलाही असो, प्रक्षोभक भाष्य टाळले तर तो संपू शकतो. तुमच्या बोलण्याची हेडलाईन होत असेल, पण असं न करणं सगळ्यांच्या हिताचं आहे. कारण हेडलाइन नेहमी निगेटीव्ह असते. त्यामुळे आपल्याा कायद्याच्या चौकटीत राहून शांतीसाठी काम करायला हवं. आपण सगळे एक आहोत आणि एक राहू. आपण भारतीय आहोत आणि भारतीय राहू, हाच विचार असला पाहिजे,’असं ते म्हणाले.
मकरंद यांच्या ‘शूरवीर’ या सीरिजबद्दल सांगायचं तर ही सीरिज अन्य युद्धआधारित चित्रपट वा सीरिजपेक्षा ही सीरिज वेगळी आहे. भारतातील तिन्ही सैन्य दलाचे सर्वोत्तम लोक एकत्र येतात आणि हेच या सीरिजचं वैशिष्ट्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
‘शूरवीर’ ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत्या 15 जुलैला प्रदर्शित होतेय. यात मकरंद देशपांडे यांच्याशिवाय मनीष चौधरी, रेजिना कैसेंड्रा, आदिल खान, अभिषेक साहा, कुलदीप सरीन, फैजल राशिद, साहिल मेहता, शिव्या पठानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.