'हेरा फेरी ३' मधून परेश रावल (Paresh Rawal) यांनी बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या या निर्णयामुळे चाहते तर निराशच झाले. क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्यांनी सिनेमा सोडल्याचं बोललं गेलं. मात्र नंतर परेश रावल यांनी स्वत:च ट्वीट करत क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे सिनेमा सोडत नसल्याचं सांगितलं. तसंच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासाठी मनात आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना असल्याचंही ते म्हणाले. पण मग सिनेमा का सोडला याचं कारण काही त्यांनी स्पष्ट केलं नाही. आता दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) यांनीही परेश रावल यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
'टीव्ही ९ भारतवर्ष'ला प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले, "परेश रावल हेरा फेरी ३ सिनेमातून बाहेर पडत आहेत हे मला कळलं तेव्हा मी भूत बंगला सिनेमाच्या शूटिंगमध्ये होतो. त्यांनी मला सिनेमा सोडण्याचं कारण सांगितलेलं नाही. त्यांनी हा निर्णय का घेतला हे मलाही माहित नाही. ते माझ्याशी बोलतही नाहीयेत. ते जर माझ्याशी नीट बोलले तर मला कारण कळेल ना. माझ्यामुळे त्यांना काहीही प्रॉब्लेम नाहीए, पण तरी त्यांनी सिनेमातून बाहे पडण्याचं कारण अद्याप सांगितलेलं नाही."
दुसरीकडे, परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यानंतर आता अक्षय कुमारने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अक्षयचं प्रोडक्शन हाऊस केप ऑफ गुड्स या सिनेमाची निर्मिती करत आहे. परेश रावल यांनी सिनेमासंबंधी कॉन्ट्र्रॅक्ट साईन केला होता. मानधनही घेतलं होतं. आता ते सिनेमातून बाहेर पडत आहेत. म्हणून अक्षयने या अनप्रोफेशनल बिहेवियरसाठी २५ कोटींची नुकसानभरपाई मागितली आहे. अद्याप यावर आता परेश रावल यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.
अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी 'हेरा फेरी'सह 'गरम मसाला', 'वेलकम', 'भूल भुलैया' अशा अनेक हिट चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. दोघं लवकरच प्रियदर्शन यांच्या आगामी 'भूत बंगला' चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, आता परेश रावल या कायदेशीर नोटीशी काय उत्तर देतात, आणि 'हेरा फेरी ३'चं भविष्य काय ठरतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.