Diljit Dosanjh: पंजाबी इंडस्ट्रीचा सुपरस्टार अन् बॉलिवूड लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझचा आज ४१ वा वाढदिवस आहे. दिलजीत दोसांझनं आपलं वेगळेपण जपत जगभर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची गाणी जगभर ऐकली जातात. त्याच्या गाण्यात अशी जादू आहे की ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करते. चाहत्यांचं प्रेम, प्रसिद्धी यासोबतच त्यानं भरपूर पैसा कमावला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला दिलजीत दोसांझ हा आपल्या मेहनतीच्या बळावर विलासी जीवन जगत आहे. आज वाढदिवसानिमित्त दिलजीत दोसांझची नेट वर्थ किती आहे? हे जाणून घेऊया.
दिलजीत दोसांझनं सुपरहिट पंजाबी गाणी दिल्यानंतर त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याला बॉलिवूडमध्येही खूप पसंत केलं जातं. चमकीला, सूरमा, उडता पंजाब, फिल्लौरी आणि गुड न्यूज सारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. या चित्रपटांमधील त्याच्या कामाचे खूप कौतुकही झाले आहे. आज दिलजीतकडे कशाचीही कमतरता नाही. पण, दिलजीतने त्याच्या आयुष्यात असा काळही पाहिला आहे जेव्हा त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.
फक्त १० वी पास असलेला दिलजीत दोसांझ आज कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. रिपोर्ट्सनुसार, दिलजीत हा वैयक्तिक कार्यक्रमासाठी 4 कोटी मानधन घेतो. तर एका कॉन्सर्टसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतो. मार्च 2024 पर्यंत दिलजीत दोसांझची एकूण संपत्ती 172 कोटी रुपये होती. याबाबतची माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे.
दिलजीत दोसांझला कारची खूप आवड आहे, त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ ते रोल्स रॉयसपर्यंत महागड्या गाड्या आहेत. सध्या दिलजीत दोसांझ हा 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' (Dil-Luminati Tour) कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. भारताच्या विविध शहरांत हे कॉन्सर्ट होत आहेत. भारतातील दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.