बॉलिवूडची सुंदरी दिया मिर्झा (Dia Mirza) लोकप्रयि अभिनेत्री आहे. 'रहना है तेरे दिल मे' सिनेमानंतर ती अनेकांची क्रश झाली. दियाने मोजक्याच पण उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केलं. दिया मिर्झा अभिनयासह तिच्या समाजकार्य आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येते. पर्यावरण आणि निसर्गाच्या रक्षणासाठी ती दीर्घकाळापासून आवाज उठवत आहे. नुकतंच दियानं कांचा गचीबोवली इथल्या जंगलतोडीच्या निषेधार्थ पोस्ट केली होती. तिनं विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. यावेळी तिच्यावर एआय- जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, या आरोपांवर आता दियानं सडेतोड उत्तर देत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
दियानं सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आय-जनरेटेड फोटो पोस्ट केल्याचे आरोप फेटाळत तिनं तेलंगणा सरकारला तथ्ये पडताळण्याचं आवाहन केलं आहे. दियानं रविवारी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. तिनं लिहलं, "तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी काल एक ट्विट केलं होतं. त्यांनी कांचा गचीबोवली इथल्या परिस्थितीबद्दल काही दावे केले होते. त्यापैकी एक दावा असा होता की मी सरकारने लिलाव करू इच्छित असलेल्या ४०० एकर जमिनीवर जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ बनावट एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडीओ वापरल्या होत्या. हे पूर्णपणे खोटं विधान आहे. मी एकही एआय जनरेटेड फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केलेला नाही. असे दावे करण्यापूर्वी मीडिया आणि तेलंगणा सरकारने त्यांच्या तथ्यांची पडताळणी करावी", या शब्दात तिनं तेलंगणा सरकारला सुनावलं.