Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बायकोचं तोंड किती वेळ बघाल?", L&Tच्या सुब्रमण्यन यांच्या वक्तव्यावर दीपिका भडकली, म्हणाली- "तुमच्यासारखे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 09:30 IST

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मात्र सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. 

इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करा, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांनी कामाच्या तासाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. पण, कामाच्या तासाबद्दल वक्तव्य करताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पत्नीबद्दलही वादग्रस्त विधान केलं आहे. 

सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावं, असं विधान केलं. "कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर यावं. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा ", असं ते म्हणाले. त्यांनी केलेलं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने मात्र सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. 

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सुब्रमण्यन यांच्या या वक्तव्याबद्दल पोस्ट शेअर करत निराशा व्यक्त केली आहे. "उच्च पदावर असलेल्या व्यक्ती अशा प्रकारचे वक्तव्य करतात हे धक्कादायक आहे", असं म्हणत तिने #mentalhealthmatters हा हॅशटॅग दिला आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये "त्यांनी हे अधिक वाईट केलं आहे", असंही दीपिकाने म्हटलं आहे. 

काय म्हणाले सुब्रमण्यन? 

"मी तुम्हाला रविवारीही कामावर बोलावू शकत नाही, याचा मला खेद होतो. तुम्हाला रविवारीही काम करण्यास भाग पाडता आले असते, तर मला खूप आनंद झाला असता. कारण मी स्वत:ही रविवारी काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्यांची तोंडे किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणे गरजेचे आहे"

टॅग्स :दीपिका पादुकोणव्यवसाय