Join us

शाहरूख पाठोपाठ विद्या बालनचीही ‘कोरोना वॉरियर्स’ला लाख मोलाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 16:01 IST

इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली माहिती

ठळक मुद्देविद्या सध्या ‘शकुंतला देवी’ या सिनेमाच्या तयारीत बिझी आहे. 

कोरोनाने अख्ख्या जगभर हाहाकार माजवला असताना भारतातही कोरोना रूग्णांशी संख्या चिंताजनकरित्या वाढतेय. दरदिवशी शेकडोंच्या संख्येने रूग्ण वाढत आहेत. कोरोनाविरूद्धच्या लढ्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून  लढत आहेत. दुसरीकडे मदतीचा ओघही सुरु आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन   देशातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-्यांसाठी 1000 पीपीई( पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ) किट्स देणार आहे.

इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्वत: ही माहिती दिली. ‘डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थेट करोना रुग्णांच्या संपर्कात येतात. त्यातील एका जरी वैद्यकीय कर्मचा-याला करोनाची लागण झाली तर त्या रुग्णालयाच्या सर्व कर्मचा-यांना याचा धोका असू शकतो. अशात वैद्यकीय कर्मचा-यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी मी 1000 पीपीई किट्स देत आहे’, असे विद्या व्हिडीओत म्हणतेय.याआधी शाहरूख खानने आरोग्य कर्मचा-यांसाठी 25 हजार पीपीई किट्स दिल्या होत्या. आता शाहरूखपाठोपाठ विद्याही आरोग्य कर्मचा-यांना पीपीई किट्सच्या रूपात मोलाची मदत करणार आहे.

विद्या सध्या ‘शकुंतला देवी’ या सिनेमाच्या तयारीत बिझी आहे. अनु मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून तो पुढील वर्षी 8 मार्चला तो रिलीज होणार आहे. शकुंतला देवींनी अगदी लहानपणापासूनच झटपट आकडेमोड करण्याच्या आपल्या प्रज्ञेने जगाला थक्क करून सोडले होते. कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना शकुंतला देवींचे नाव जगभरात गणितज्ज्ञ म्हणून गाजले. त्यांच्या आकडेमोड करण्याच्या अद्भुत कौशल्याची दखल गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने देखील घेतली.

टॅग्स :विद्या बालनकोरोना वायरस बातम्या