Join us

CoronaVirus: महानगरपालिकेने मानले शाहरुख खानचे आभार, किंग खानचे कौतूक करावे तेवढे कमीच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 14:49 IST

किंग खानने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्याची ४ मजली वैयक्तिक कार्यालय केले महापालिकेसाठी खुले  

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच जण आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपले चार मजली वैयक्तिक कार्यालय महानगरपालिकेला विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी खुले करून दिले आहे. त्याच्या या उदार कार्यासाठी महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शाहरुख खान आणि गौरी खान यांचे शनिवारी आभार मानले.    शाहरुख खानने पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच अनेक शासकीय, वैद्यकीय संस्थांना आपल्या विविध भागीदारी कंपन्यांद्वारे मदत केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदतीसोबतच जागेची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागणार हे जाणून आपले ४ मजली वैयक्तिक कार्यालय महापालिकेसाठी खुले करून दिले आहे. या ठिकाणी महापालिकेला मुले, महिला आणि वयोवृद्धांसाठी विलगीकरण कक्ष स्थापणे शक्य होऊ शकेल.

शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाउंडेशन आणि रेड चिलीज व्हीएफएक्स या त्याच्या कंपन्यांद्वारे कोरोनाशी लढण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी उभारलेल्या PM CARE फंडालाही मोठी मदत देऊ केली आहे.

शाहरूख खानने केलेल्या मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आभार मानले आहेत.

टॅग्स :शाहरुख खाननगर पालिकाकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेअरविंद केजरीवाल